वेंगुर्ले नगरसेविका गौरी माईणकरांनी केली कार्याची भावनिक सुरुवात

Edited by: दिपेश परब
Published on: December 27, 2025 17:06 PM
views 141  views

वेंगुर्ले : नुकत्याच पार पडलेल्या वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर नवनियुक्त नगरसेविका सौ. गौरी गणेश माईणकर यांनी आज आपल्या सार्वजनिक जीवनातील नव्या प्रवासाची अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी सुरुवात केली.

नगरपरिषदेच्या अधिकृत प्रवेशापूर्वी त्यांनी दिवंगत माजी नगराध्यक्ष तथा शिवम फाउंडेशनचे अध्यक्ष कै. पप्पू कुबल यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व श्रद्धेने आशीर्वाद घेतले.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना सौ. गौरी माईणकर म्हणाल्या, “कै. पप्पू कुबल आणि माझे पती गणेश माईणकर यांचे नेतृत्व व मार्गदर्शन माझ्यासाठी नेहमीच दिशादर्शक राहिले आहे. आज नगरपरिषदेत प्रवेश करताना कै.पप्पू कुबल यांची उणीव पावलोपावली भासत आहे. निधन होण्यापूर्वीच त्यांनी मला नगरसेविका करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याची मला ठाम भावना आहे.”

याप्रसंगी गणेश माईणकर यांनी कै. पप्पू कुबल यांनी आयुष्यभर केलेल्या सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.

केवळ औपचारिकता न करता, दिवंगत नेत्याच्या चरणी आपल्या विजयाचे फल अर्पण करत गौरी माईणकर यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. प्रसन्ना कुबल आणि गणेश माईणकर यांची जिव्हाळ्याची मैत्री, त्यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि समाजाभिमुख विचारसरणी डोळ्यांसमोर ठेवून त्या आता वेंगुर्ला नगरपरिषदेत आपल्या कार्याचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

दरम्यान, भाजपा माजी महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कुबल, सुनील आळवे व नानू किडीये यांनी गौरी माईणकर यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.