मदर क्वीन्सचा दिमाखदार स्नेहसंमेलन सोहळा

Edited by: विनायक गांवस
Published on: December 27, 2025 15:42 PM
views 89  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा शनिवार दिनांक 20 डिसेंबर रोजी दिमाखदारपणे संपन्न झाला. दीपप्रज्वलनाने व स्वागत समारंभाने बॅरिस्टर नाथ पै सभागृहात या भव्य सोहळ्यास प्रारंभ झाला.

यानंतर शिष्यवृत्ती परीक्षा 2025 मधील प्रशालेच्या शिष्यवृत्तीधारकांचे सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले तसेच इयत्ता दहावीची विद्यार्थीनी पुर्वा प्रसाद गावडे हिस सीन्सियर स्टूडंट अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सविता परब (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सावंतवाडी) यांना प्रशालेतर्फे स्नेहभेट देऊन सन्मानित करण्यात आले. तद्नंतर शाळेची गुणवत्तापूर्ण प्रगती व विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी दर्शविणाऱ्या रिपोर्ट डॉक्युमेंटरीचे सादरीकरण करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले, संस्थेच्या चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, विश्वस्त युवराज लखमराजे भोसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे संचालक डी.टी.देसाई, सहसंचालक ॲड. श्यामराव सावंत, सदस्य जयप्रकाश सावंत व डॉ .सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

 यानंतर विघ्नहर्त्या गणेशाची नृत्याद्वारे आळवणी करून सोहळ्याची दिमाखदारपणे सुरुवात झाली. पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील सर्व इयत्तांनी वार्षिक स्नेहसंमेलनात आपले कलागुण सादर केले. यामध्ये ऐंशीच्या दशकातील सुमधूर रेट्रो गाण्यांच्या तालावर लहान मुलांनी नृत्ये प्रस्तुत केली. सोशल मीडियाच्या व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, जंकफूडमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम,  बालपणातील मनोरंजक खेळ व मुक्तपणे मैदानावर बागडण्यातील आनंद दर्शविणारे क्षण नृत्याद्ववारे व्यक्त करण्यात आले.तसेच गुरूभक्त एकलव्याची  गुरूनिष्ठा वर्णिणारे नृत्य, जगात सत्य व अहिंसेचे तत्व रूजवणाऱ्या महात्मा गांधींची महती दर्शविणारे नृत्य, झासीचे रक्षण करण्यासाठी इंग्रजांशी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाईच्या पराक्रमाचे स्मरण करणारे नृत्य , छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांच्या भेटीतील प्रसंग साकारणारा व छत्रपतींची थोरवी वर्णिणारा पोवाडा, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचे झुंजार शौर्य दर्शविणारा नृत्याविष्कार , पोलिस व आर्मीप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी नृत्ये तसेच विविध खेळांचे महत्व पटवून देणारे नृत्य  त्याचप्रमाणे धार्मिक मतभेद दूर सारून सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारे विविध धार्मिक सणांवर आधारीत नृत्य असे विविध नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी आकर्षक व सुसंगत वेशभूषा परिधान करत सादर करून सर्व उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.कार्यक्रमाचे ओघवते निवेदन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्वक केले.

सोहळ्याचे प्रास्ताविक, स्वागत व अहवाल वाचन श्रीम इंतीझिया फर्नांडिस यांनी केले तर आभार श्रीम अमिना नाईक यांनी  मानले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी ,पालक शिक्षक प्रतिनिधी, माता पालक प्रतिनिधी यांनी मुख्याध्यापिका श्रीम अनुजा साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली.