
दोडामार्ग : राजकारण आणि पक्षीय स्वार्थापेक्षा शेतकरी मोठा मानून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाची आज गरज आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे नेते गणेश प्रसाद गवस यांनी मांडलेली भूमिका स्वागतार्ह असून, प्रत्येक राजकीय पक्षात अशाच निर्भीड नेतृत्वाची शेतकरी वर्ग वाट पाहत आहे, अशी प्रतिक्रिया काजू बागायतदार संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास सावंत यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांचे नुकसान जर चहुबाजूंनी होत असेल, तर पक्ष, पद आणि राजकारण बाजूला ठेवून स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जागृत करत प्रसंगी पदत्याग करून सर्वसामान्य जनतेसाठी उभे राहणारे नेतृत्व आज आवश्यक आहे. “असा गणेश प्रसाद प्रत्येक पक्षात निर्माण व्हावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपला अनुभव सांगताना श्री. सावंत म्हणाले, “२००५ साली मी सुद्धा तत्कालीन सत्ताधारी आघाडीतील एका पक्षाचा पदाधिकारी होतो. मात्र हत्तीच्या उपद्रवामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रश्नावर पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र करत बांदा येथे जनआंदोलन उभारले. शासनाला जेरीस आणून त्यावेळी हत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आवश्यक ती नुकसानभरपाई मिळवून देण्यात यश आले.”
आज अनेक मित्र सत्ताधारी पक्षांमध्ये मोठ्या पदांवर आहेत; मात्र स्वतःच्या राजकीय प्रगतीपलीकडे जाऊन जनतेच्या ज्वलंत प्रश्नांसाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत, याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
श्री. विलास सावंत यांनी गणेश प्रसाद यांचे आभार मानत पुढे स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नुसती पत्रकार परिषद घेऊन थांबू नका. शेतकऱ्यांसाठी ठोस कृती आराखडा जाहीर करा. वेळ पडल्यास आम्हालाही सांगा; सर्व शेतकरी, बागायतदार आणि जनतेला सोबत घेऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला भाग पाडू.”
शिवसेनेच्या या भूमिकेमुळे शेतकरी व काजू बागायतदारांमध्ये नव्या आशेचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील ठोस कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










