
दोडामार्ग : दोडामार्ग राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेचा लाभ घेणाऱ्या रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण प्रणालीतून लाभ घेणाऱ्या सर्व रेशन कार्डांवरील प्रत्येक सदस्याचे ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असून, अपूर्ण राहिल्यास धान्य लाभ बंद होण्याची शक्यता आहे, असा इशारा तहसीलदार दोडामार्ग यांनी दिला आहे.
दोडामार्ग तालुक्यातील एकूण ३४३२८ रेशन कार्डांपैकी २४४१९ लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, अद्याप ९९०९ लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. संबंधित लाभार्थ्यांनी तातडीने आपल्या नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानात जाऊन ई-पॉस (e-POS) मशीनवर अंगठा (फिंगरप्रिंट) लावून बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे किंवा ‘मेरा ई-केवायसी ॲप’ तसेच ‘मेरा रेशन ॲप’च्या माध्यमातून ऑनलाइन ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, ज्या रेशन कार्डधारक किंवा लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही आणि त्यामुळे धान्य लाभ बंद झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित लाभार्थ्यांची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यांचे आधार कार्ड व मोबाईल क्रमांक रेशन कार्डाशी लिंक नाहीत, त्यांनी त्वरित रास्त भाव धान्य दुकानदार किंवा तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत संपर्क साधून आवश्यक अद्ययावत करावे.
याशिवाय, कुटुंबातील एखादी व्यक्ती शासकीय सेवेत/निवृत्त पेन्शनधारक असल्यास किंवा वार्षिक उत्पन्नात वाढ झालेली असल्यास त्यांनी तात्काळ ‘अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा’ असे आवाहनही तहसीलदार दोडामार्ग यांनी केले आहे.










