
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई करत असताना महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना दोडामार्ग येथे घडली आहे. याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी लिलाचंद गणपत जाधव (वय ३०, रा. सध्या दोडामार्ग) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई सुरू असताना २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.३५ वाजता दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाजवळ ही घटना घडली. महसूल अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, बांद्याहून दोडामार्गकडे येणारा आयशर कंपनीचा पिवळ्या रंगाचा डंपर (क्रमांक GA 09 U 5066) अवैध वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल कर्मचाऱ्यांनी सदर वाहन अडवले. मात्र, डंपर चालकाने थांबण्यास नकार देत वाहन पुढे नेले. अखेर महसूल कर्मचाऱ्यांनी डंपर अडवून तपासणी सुरू केली असता त्यात वाळू आढळून आली.
दरम्यान, राजु प्रसादी (रा. दोडामार्ग) हे घटनास्थळी क्रेटा कारमधून आले. त्यांनी महसूल कर्मचाऱ्यांना शासकीय काम करण्यास विरोध करत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी लिलाचंद जाधव यांच्या अंगावरील जॅकेटची टोपी ओढून मोबाईल हिसकावून घेत हाताने मारहाण व धक्का-बुक्की केली. या हल्ल्यात जाधव यांच्या डाव्या हाताच्या पंजाला दुखापत झाली.
या गोंधळाचा फायदा घेत डंपर चालकाने वाहन गोवा हद्दीत पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सदर प्रकारामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने राजु प्रसादी व डंपर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व भारतीय कायदेशीर संहिता (BLS) अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0200/2025 नुसार नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.











