
दोडामार्ग : सासोली वाघमळा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. गणपत संभाजी देसाई यांच्या घराला शनिवारी सायंकाळी सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लक्ष्य केले. घरामध्ये कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरावरील कौले काढून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे व साहित्य अस्ताव्यस्त करून मौल्यवान ऐवज लंपास केला. या चोरीमध्ये ८ हजार रुपये रोख रक्कम, १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, एक तोळ्याची सोन्याची चैन, कानातली कुडी, हातातील रिंग, ब्रेसलेट तसेच नथ असा मौल्यवान ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घरमालक बाहेरून परत आल्यानंतर घरात झालेला प्रकार लक्षात आला. यानंतर तातडीने दोडामार्ग पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे सासोली वाघमळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून पोलिस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.










