
दोडामार्ग : दोडामार्ग येथील दिवाणी न्यायालयात गुरूवारी तालुका विधी सेवा समिती दोडामार्ग व वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील ग्रामसेवकांसाठी नुकतेच लोक अदालत संदर्भात एक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. लोकअदालत या संकल्पनेबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले.
दिवाणी न्यायाधीश वाय. पी. बावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्यासोबत तालुका बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. विशाल नाईक, ॲड. मनोज सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात लोक अदालत म्हणजे काय, तिचे महत्त्व आणि स्थानिक पातळीवरून ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंतचे तिचे कार्यक्षेत्र यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विविध शासकीय करांची विशेषतः पाणीपट्टी व घरपट्टी वसुली न झाल्यास त्याचे काय कायदेशीर परिणाम होऊ शकतात, याबाबतही माहिती देण्यात आली.
न्यायाधीश बावकर यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांनी वेळेवर कर भरणा करणे आवश्यक असून त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास शक्य होतो. पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीत अडथळा आल्यास, ही प्रकरणे लोक अदालतसारख्या पर्यायी तक्रार निवारण मंचावर मांडता येऊ शकतात. या माध्यमातून जलद न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होतो, असे स्पष्ट केले. सहा. गटविकास अधिकारी यांनी देखील ग्रामसेवकांना लोक अदालतबाबत मार्गदर्शन केले.
ॲड. मनोज सावंत यांनी कायद्यासंबंधित तांत्रिक बाबींचे सविस्तर विवेचन करताना लोक अदालत प्रक्रियेमधील पारदर्शकता, कार्यक्षमतेचे महत्त्व आणि तिचा सर्वसामान्यांसाठी असलेला उपयोग स्पष्ट केला. तसेच येथील न्यायालयात येत्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी न्यायाधीश वाय. पी. बावकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीत सर्व ग्रामसेवकांनी वादपूर्व प्रकरणे जास्तीत जास्त ठेवण्याबाबत व त्या निकाली काढण्याबाबत आवाहन केले. या शिबिरास तालुक्यातील ग्रामसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.