हळबे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली

Edited by:
Published on: December 06, 2025 16:27 PM
views 17  views

दोडामार्ग : महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यामागील उद्देश म्हणजे त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि संघर्ष जाणून घेणे होय. त्यातून जगण्याची प्रेरणा मिळते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे चरित्र वाचावे, असे प्रतिपादन डॉ. सुभाष सावंत यांनी केले. येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सावंत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, “बाबासाहेबांनी सर्व जाती-धर्मासाठी काम केले. महिलांच्या उत्थानाचा विचार मांडला. कोकणातील कुणबी समाजाच्या प्रश्नांसाठी सर्वप्रथम संघर्ष केला. मजूर, महिला आणि शोषित पिढीच्या प्रश्नांना अग्रक्रम दिला. महापुरुषांना जातीच्या चष्म्यातून न पाहता त्यांच्या कर्तृत्वाकडे पहा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. बाबासाहेब 36-36 तास अभ्यास करायचे. आपण तरी दररोज किमान तीन तास अभ्यास करायला हवा,” असा सल्लाही त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. डी. गाथाडे यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी कदम हिने केले, तर उपस्थितांचे आभार पंकजा मनेरिकर हिने मानले.