सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स डे उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: July 01, 2025 20:59 PM
views 12  views

सावंतवाडी : 'डॉक्टर म्हणजे देव' ही भावना आजही रुग्णांच्या मनात कायम आहे आणि डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती आजही ती जपते आहे. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरने आपले कर्तव्य निडरपणे बजावावे, असे आवाहन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. ज्ञानेश्वर आईवळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते केक कापून डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉक्टर नेहमीच सेवाभावी वृत्तीने काम करतात, ते आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, परंतु रुग्णांना बरे करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. म्हणूनच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक डॉक्टरांना देवाप्रमाणे मानतात, असे त्यांनी सांगितले.

डॉक्टर्स डे का साजरा केला जातो याबद्दल माहिती देताना सांगण्यात आले की, थोर वैद्य डॉ. विधानचंद्र रॉय यांचा जन्म आणि मृत्यू एकाच दिवशी, म्हणजेच १ जुलै रोजी झाला होता. त्यांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी येत असल्याने त्यांच्या स्मरणार्थ आणि सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी १ जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो.डॉ. विधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात केक कापण्यात आला. तसेच आपल्या सहकारी डॉक्टर्सना गुलाब पुष्प देऊन डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांना उत्कृष्ट सेवा बद्दल प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला रुग्णालयातील परिचारिका श्रीमती विजया उबाळे, प्राची राणे, दीक्षा वेंगुर्लेकर, श्रीमती बागेवाडी, श्रीमती गोसावी आणि रुग्णसेविकांनीही आपले विचार व्यक्त केले.या कार्यक्रमाला डॉ. गिरीशकुमार चौगुले, डॉ. प्रवीण देसाई, डॉ. सागर जाधव, डॉ. गोविंद आंबुरे , डॉ. शिवम तसेच सिटीस्कॅन विभागातील प्रथमेश परब सर्व कर्मचारी आणि रुग्णालयातील इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.