शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर कामावर हजर

युवक काँग्रेसच्यावतीने स्वागत
Edited by: दिपेश परब
Published on: August 15, 2023 12:00 PM
views 382  views

वेंगुर्ला : ३१ जुलै २०२३ रोजी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी डॉक्टर मिळण्यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्याचवेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सोबत शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी आठवड्याला तीन डॉक्टर आम्ही देऊ असे तोंडी आश्वासन दिले होते. त्यात दोन दिवसासाठी डॉक्टर वजराटकर तीन दिवसासाठी डॉक्टर देसाई व एक दिवसासाठी डॉक्टर सामंत असे आम्हाला सांगण्यात आले होते. त्याचवेळी युवक काँग्रेसने त्यांच्याकडे कायमस्वरूपी डॉक्टर मिळणे बाबत मागणी केली होती व आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे असे सांगण्यात आले होते. ३१ जुलै २०२३ या काँग्रेसच्या निवेदनानंतर ५ ऑगस्ट २०२३ रोजी शिरोडा येथील काही लोकप्रतिनिधींनी जिल्हा चिकित्सकांची भेट घेऊन  दोन ओळींचे निवेदन देऊन प्रसिद्धी पत्र केले की शिरोडा उपजिल्हा रुग्णालयासाठी तीन डॉक्टर दिले आहेत, माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की फुकटचा श्रेय कोणीही घेऊ नये आणि ज्या ज्या वेळी आरोग्यचा प्रश्न उद्भववेल त्या त्यावेळी मी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो की सर्वांनी एकत्र येऊन जिल्हा रुग्णालयातच्या बाबतीत जिल्हा रुग्णालयात सेवा मिळण्याबाबत लढा द्यावा व संघटित व्हावे कोणीही श्रेयासाठी राजकारण करू नये. तसेच आज १५ ऑगस्ट रोजी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर हजर झाले त्यांचे स्वागत आज युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आले.


नवीन नियुक्त झालेल्या डॉक्टर यांच्यामध्ये डॉ. पी.डी.वजराटकर (मंगळवार; शुक्रवार) सर्जन, डॉ. पी.एल.देसाई (सोमवार;बुधवार; शनिवार) बालरोगतज्ञ, डॉ.डी.एस.सावंत (गुरुवार) स्त्रीरोगतज्ञ, डॉक्टर सुरेश राजाभाऊ राख (कायमस्वरूपी) एम.बी.बी.एस, डॉ. ओमकार परमेश्वर तिडके (कायमस्वरूपी) एम.बी.बी.एस, अशी नवीन नियुक्ती झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत.


यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी उपसभापती सिद्धेश परब, शिरोडा उपसरपंच चंदन हडकी, वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष कृष्णा आचरेकर, शिरोडा ग्रामपंचायत सदस्य सौ. अनिष्का गोडकर, प्रथमेश उर्फ बंड्या परब, आनंद गोडकर, युवक काँग्रेस उपाध्यक्ष  गौरव परब उपस्थित राहून यांच्यावतीने सर्व डॉक्टर्स यांचा स्वागत करण्यात आला.