महावितरणचे मनुष्य बळीच मोजत बसायचे का..?

Edited by: विनायक गांवस
Published on: May 26, 2024 12:16 PM
views 105  views

सावंतवाडी : दरवर्षी महावितरणच्या गलथान कारभारामुळे एकतरी मनुष्य बळी हा ठरलेला आहे. शेतकऱ्यांच्या गुराढोरांचे बळी जात असताना मागच्या काही वर्षांत मनुष्य बळीही महावितरणमुळे जात आहेत. नुकसान भरपाई म्हणून तुटपुंजी रक्कम हाती टेकवण्याच काम महावितरण करतं. बदल्यात कुटुंबातील व्यक्तीला कायमस्वरूपी सेवेत घेण्याचं दिलेलं आश्वासन काळानुरूप हवेत विरून जात. विषय धगधगता असेपर्यंत आश्वासनांची खैरात मांडणारे लोकप्रतिनिधी केवळ कागदी घोडे नाचविण्याच काम करतात. प्रत्यक्षात पाच लाख वगळता अन्य मदतीची अपेक्षा अन् रक्ताचा माणूस हरपल्याच दुःख सोबत राहत.  त्यामुळे सर्वसामान्यांनी महावितरणचे मनुष्य बळीच मोजायचेत का ? असा यक्षप्रश्न आता निर्माण झाला आहे. 

याला कारण ठरलं ते बांदा येथील घडलेली दुर्घटना. वारंवार विज ग्राहकांनी लक्ष वेधूनही महावितरणच झालेलं दुर्लक्ष याला कारणीभूत आहे. या आधीचा अधिकारी वर्ग जातीनिशी समाजाशी संपर्क असलेले असयाचा. त्यामुळे ग्राहकहीत सामाजिक जबाबदारीच भान ठेवून ते कार्यरत असंही लोकांचे म्हणणन आहे. मात्र, आत्ताचा अधिकारी वर्ग हा सुस्त झालेला आहे. केबिनपलिकडे त्यांचं विश्व नाही. ग्राउंडवरच्या परिस्थितीची त्यांना माहिती नाही. कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळेच असे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. रविवारी बांदा शहरात गडगेवाडी येथील कुंभारदेवणे ओहळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर विद्युत भारीत लाईन तुटून पडल्याने महिलेचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेला महावितरण जबाबदार असल्याचा आरोप करत बांदा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आता सरकारचे पाच लाख तात्काळ मदत म्हणून जाहीरही होतील. परंतु, पाच लाखाने लाख मोलाचा गेलेला माणूस पुन्हा आणता येणार का ? हा प्रश्न सरकारला लोक विचारत आहेत. ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही जिल्ह्यात अनेक घटना घडल्या आहेत. स्वतःच्या कर्मचाऱ्यांचा बळी घेण्याच काम या महावितरणने केलं आहे. ते डिपार्टमेंट सामान्य जनतेला काय न्याय देणार ? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. सावंतवाडी शहरातील पाळंदे कुरीअरचे श्री. गवस व त्यांचा सहकारी, मागील वर्षी अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा व दुर्लक्षामुळे ओटवणे गावीतील १४ वर्षीय विनय कोटकर मुलाचा हकनाक गेलेला बळी ! अशी किती म्हणून उदाहरणे द्यावीत. परंतु, याच सोयरसुतक महावितरणला पडलेलं नाही. त्यामुळे अशा बेजबाबदार अधिकारी लोकांवर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लोकांकडून होत आहे. 

जीर्ण झालेले विद्यूत पोल, पावसापूर्वीची दक्षता याबाबत जागरूक नागरिक महावितरणला जाग करण्याच काम करतात. सद्यस्थितीत अनेक पोल सडलेले आहेत. आज जे बांद्यात झालं ते उद्या कुठे घडेल सांगण मुश्किल आहे. अशात महावितरण व ठेकेदारांकडे मनुष्यबळ नाही अशी वेळ मारून नेणारी उत्तरे अधिकाऱ्यांकडे तयारच आहेत. त्यामुळे आता लोकांचे जीव वाचवायचे असतील तर विद्युत खांबांची स्ट्रक्चरल ऑडिट झालीत का ? विद्यूत भारीत लाईनची परिस्थिती काय आहे ? स्पार्कींच्या ठिकाणी कोणती दक्षता घेतली ? जीर्ण पोल बदलले गेलेत की नाही ? बळी जाणार नाही यासाठी महावितरणने कोणती उपाययोजना केली ? याचा आढावा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, स्थानिक आमदार मंत्री दीपक केसरकर आदींसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मंत्रीमहोदयांनी घेत जातीनिशी लक्ष घालणं काळाची गरज  आहे. अन्यथा महावितरणचे मनुष्य बळी मोजक्यापलिकडे व सरकारचे आलेले पाच लाख नुकसानभरपाई म्हणून देण्यापलीकडे हाती काही उरणार नाही. एवढं मात्र नक्की...!