मातीपासून मुलांना दूर लोटू नका !

आजच राजकारण किळसवाणं : ज्येष्ठ साहित्यिक लीलाधर घाडी
Edited by: विनायक गावस
Published on: March 23, 2024 11:56 AM
views 145  views

कोकणचं पहिलं दैनिक 'दै. कोकणसाद' व कोकणचं नं. १ महाचॅनल 'कोकणसाद LIVE' च्या माध्यमातून 'जागर कोकणच्या साहित्य रत्नांचा', ही विशेष मालिका सुरु करण्यात आलीय. साहित्यक्षेत्रात योगदान देणारे साहित्यिक व साहित्यप्रेमी यांच्या त्यामध्ये मुलाखती घेण्यात येत आहेत. याच विशेष मालिकेच्या २२ व्या पुष्पात विविध साहित्यिक, शैक्षिणिक व सामाजिक संस्थांचे सदस्य, सिंधुदुर्ग साहित्य संघाचे विद्यमान अध्यक्ष लीलाधर दत्ताराम घाडी यांची दै. कोकणसादचे संपादक संदीप देसाई व प्रतिनिधी विनायक गांवस यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.

पुष्प २२ वं

१.आपल्या लेखनाची सुरुवात कशी झाली ?

विद्यार्थी असताना मराठी हा माझा आवडता विषय होता. निबंध हा प्रकार विशेष आवडीचा होता. वडील शासकीय सेवेत असल्यानं अनेक ठिकाणी बदली व्हायची. दहावीला असताना वेंगुर्ला हायस्कूलला असताना सिद्धये मॅडम मराठी व संस्कृत शिकवायच्या, त्यांनी सर्वप्रथम माझ्या लिखाणाच कौतुक केलं. माझा प्रत्येक निबंध त्या वाचून दाखवत. त्यामुळे लिखाणाची आवड वाढत गेली. पुढे समाजवादी कार्यकर्ते देऊलकर सर, प्रा. वसंतराव अभ्यंकर, डॉ. गं.ना.जोगळेकर, निरंजन उजगरे, मधुभाई कर्णिक यांनी माझ्या लिखाणाला प्रोत्साहन दिल. सुरुवातीच्या काळात सुदत्तज या नावानं मी कविता लेखन करत होतो. कवीवर्य डॉ. वसंत सावंत, हरिहर आठलेकर, आ.द. राणे अशा अनेकांचा सहवास लाभला व मी लिखाण करत गेलो. माझ्या कविता नियतकालिकातून प्रसिद्ध व्हायला लागल्या. नंतर कथा साहित्य, बालसाहित्य यानंतर समाजातील घटनांवर मी लिखाण केल. बॅ. नाथ पै, प्रा.मधू दंडवतेंचा माझ्यावर प्रभाव होता. या सर्वांच्याच प्रेरणेतून मी शालेय जीवनापासून लिहायला सुरुवात केली.

२. आपल्या लेखनाला प्रेरणा कशी मिळाली ?

तो काळ फार वेगळा होता‌. अनेकांनी प्रोत्साहन दिल्यानं मी लिहित गेलो. यातूनच खरी प्रेरणा लिखाणाला मिळत गेली. विचारवंत, साहित्यिक, माझे शिक्षक हेच खरे प्रेरणास्थान आहेत. शिक्षणक्षेत्रात विनाअनुदानित पद्धती सुरू झाली अन् शिक्षणाचा ऱ्हास सुरू झाला. शिक्षण घसरत गेल ते आजवर तसंच राहिलं. त्यावेळी मी 'बोर्डाचे ब्रह्मास्त्र' हा लेख लिहिला होता‌‌. मुलाला प्रवेश मिळाला यातच पालक खूष असतात. मात्र, शिक्षणाचा दर्जा ते पहात नाहीत. मराठीतही १०० पैकी १०० मार्क आता मिळू लागले आहेत. धड मराठी बोलता येत नाही तरी पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्यामुळे शिक्षणाचा घसरलेला दर्जा सावरला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाचा देखील मी अभ्यास करत आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक गोष्टी खटकतात त्यावर माझं लिखाण सुरू आहे. समाजातील जातीयता, अंधश्रद्धा यावरही लेखन करत आहे‌. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे. ही माणसं नाहीत याचं दुःख होत‌. समाज अंधश्रद्धेच्या मागे आहे. माध्यम देखील यामागे जातात हे कुठेतरी खटकत. 


*३.गणित व विज्ञान विषयाचे शिक्षक असताना साहित्याकडे कसे वळला ?*

मराठी हा माझा आवडता विषय होता. वाचनाची अतिशय आवड होती. ग्रंथालयात मी नेहमी जात असे. शिक्षक व्हायची माझी इच्छा नव्हती. मला समाज शिक्षक अर्थात पत्रकार व्हायच होत. माझं ते स्वप्न होतं. परंतू, वडीलांनी विज्ञान शाखेकडे जाण्याचा आग्रह केल्यान मी ती शाखा निवडली. नंतर शिक्षण क्षेत्रात आलो. यात छंद कायम जोपासला. लिखाण, वाचन सुरु होत. लिहीलेल छापून येत होतं, त्याच कौतुक होत होतं. त्यामुळे लिहिण्यास अधिक बळ मिळत गेलं. आता वैचारिक लेखन करत आहे‌. देव किती खरा ? किती खोटा यावर लिहीत आहे. मी स्वतः देव मानत नाही. ऋग्वेदांचा अभ्यास मी केला आहे‌. उपनिषदे वाचली आहेत. 


*४.आपण कविता, बालकविता, कथा, बालकथा, लेखमाला, शिक्षण, चित्रपट, नाट्य व राजकीय विषयावर लेखन केलंय. या प्रवासाविषयी काय भावना व्यक्त कराल ?*

वैचारिक लेखनावर माझा अधिक भर आहे‌. लोककथा, लोकगीतांचा अर्थ कसा समजून घ्यायचा हे माझ्या लेखातून सांगितले आहे. लहान मुलं ईश्वराचा अवतार आहेत हे देखील अनेक कथांतून सांगितलं आहे‌. पण, आपण ते समजून घेत नाही. आपल्या संतांनी कोणत्याही कर्मकांडांच समर्थन केलेलं नाही. देवाची व्याख्या तुकारामांनी सांगितली आहे. 


*५. संतांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. ईश्वर माणसातच आहे अशी शिकवण त्यांनी दिली. तर विठ्ठलाला समोर ठेवून आध्यात्माचा मार्ग देखील शिकवला. याकडे कसं पहाता ?*

संतांनी कधीही कर्मकांड, चमत्कारांच समर्थन केलेलं नाही. त्यांनी नामस्मरण करायला शिकवल आहे‌. एखाद्या गोष्टीचा त्याग करायला सांगताना दिलेला दुसरा पर्याय आहे तो म्हणजे नामस्मरण असं मी मानतो‌. कर्मकांड, पुरोहितांच्या अहारी जाण्यापेक्षा नामस्मरणातून समाधान मिळवण चांगल आहे‌. संतांचा हा दृष्टिकोन आपण समजून घेतला पाहिजे. संत सावतामाळींना त्यांच्या कामातच देव दिसत होता. काम मनापासून केलं तर मोक्ष आपोआप मिळतो असं सावतामाळी म्हणतात‌. हे संत किती शिकले होते ? याचा आपण विचार करायला हवा. संत गाडगेबाबा तर आंगठेबहाद्दर होते. त्यामुळे संतांच ऐका, त्यांनी तुम्हाला शहाणं करण्याच काम केलं ही मी माझ्या लेखातून मांडत आहे.


*६.तुम्हाला कोणत्या प्रकारची कविता आवडते ?*

माझ्या कवितांबद्दल बोलायचं झालं तर सगळी आपलीच अपत्ये. त्यामुळे सगळीच प्रिय आहेत. ''मी वारंवार शिशू वर्गात जातो. कारण, अनेक हसऱ्या नाचऱ्या गडबडगोड्यांना गळ्यात गळे घालताना, हसता खिदळताना पहायचं असतं‌‌. पुढे त्यांना धर्म आणि जात चिकटण्यापुर्वी'' ही माझी आवडती कविता आहे. याच शिशू वर्गात देवालयात नसणार चैतन्य, पावित्र्य व दैवत्व देखील पहायला मिळत. ते कुठल्या प्रार्थनालयात देखील नसतं. हे या कवितेतून मांडले आहे.


*७.'छान छान पिल्लू' या बालकवितासंग्रहाबद्दल काय सांगू इच्छिता. कशी निर्मिती झाली ?*

मुलं निरागस असतात, त्यांना निरागस राहू द्यावं. मातीत मुलांना खेळण्यापासून आपण रोखतो‌. चुकिचा उद्गार काढतो. मातीपासून मुलांना कधीच दूर लोटू नका, त्यांना मातीत खेळूद्या. मातीपासून मुलांना तोडण म्हणजे आईपासून तोडण आहे‌. मुलांना त्यांच्या कलाने वाढू दिलं तर जग खूप सुंदर होईल. लहान मुलांना  आपण धर्म सांगतो त्यांचा उल्लेख करतो हे चुकीचं आहे‌. त्यांच्यापर्यंत हे पोहचू देऊ नका.'छान छान पिल्लू' या बालकवितासंग्रहातून अशाप्रकारच्या कवीता देखील मी लिहील्या आहेत. 'अ आणि ब चा प्रश्न' कथा संग्रह प्रकाशित झाला आहे. याला नाव द्यायचं होतं हतबल. पण, साहित्यिक प्रा. प्रविण बांदेकर यांनी माझ्या अ आणि ब चा प्रश्न' या कथेचं नाव या संग्रहास देण्यास सुचवलं.


*८.आजच्या बालसाहित्या विषयी काय सांगाल? व आगामी लेखनाविषयी*

खुप चांगलं लेखन बालसाहित्यिक करत आहेत‌‌. जिल्ह्यातही अनेक बालसाहित्यिक आहेत जे सुंदर लिखाण करतात. सहज लेखन करणारे हे लेखक आहेत‌. अनेक दिग्गजांनी देखील बालकवीता लिहील्या आहेत. आजकाल जग बदलत असताना बालसाहित्याच वाचन मुलांकडून करून घेतलं जातं नाही. पुस्तक हातात घेऊन बालसाहित्य वाचण्यात असणारा आनंद मोबाईल, टॅबमध्ये नाही. या पुस्तकांची मागणी देखील कमी झालीत.‌ मुलांकडे अशी पुस्तक दिली पाहिजेत‌ वाचनासाठी.


*९.नव साहित्यिकांना काय संदेश द्याल?*

मधुभाई, मंगेश पाडगावकर यांचा सहवास मला लाभला. केशवसुत माझे आवडते कवी. अनेक नावं घेता येतील. प्रत्येकाच्या लिखाणाचा पिंड वेगळा येतो. साहित्य हे दोनच प्रकारचं असतं चांगलं किंवा वाईट. चांगलं आहे ते राहील. साहित्यात सहजपणा टीकला पाहिजे. नव साहित्यिकांनी लिहीताना वाचन करण आवश्यक आहे. त्यावर विचार करून लेखन करावं. लिखाण पुन्हा पुन्हा करावं लागतं, एकदाच लिहून चालत नाही. स्वतःला ओळखायला शिका व लिखाण करा. 


*१०.आजच्या राजकारणाकडे कसं बघता ?*

आजच राजकारण अतिशय  किळसवाणं बनत चालल आहे. निष्ठा, विचार कुठेही राहिलेली नाही. कॉग्रेसमधला माणूस भाजपात दिसतो. दोन्ही पक्षांची विचारधारा भिन्न आहेत. कोणतच साम्य यात नाही. केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी हे होत आहे. ते प्रचंड किळसवाण आहे. मतदार, कार्यकर्त्यांना गृहीत धरलं जातं हे फार खटकत. केवळ थापा मारण्याच काम केलं जातं आहे. यासाठी आता जागृत होण्याची आवश्यकता आहे. धर्माच्या किंवा इतर कोणत्याही गोष्टींच्या आहारी जाऊ नका. आपल्यात एक ताकद आहे. १९७७ मध्ये हीच ताकद दिसली होती. इंदीरा गांधींमध्ये वाईट काही नव्हत. पण, त्यांनी आणिबाणी आणली अन् त्यांचा पराभव झाला. इंदिरा गांधींचा पराभव होईल असं कुणाला वाटल नव्हत. पण, ते झालं असं होऊ शकतं कारण ती ताकद आपल्यामध्ये आहे. आपल्यातील ताकद ओळखायला आली पाहिजे. पुर्वी राजकीय लोक एवढ्या उड्या मारत नव्हते जेवढ्या आता मारत आहेत. मतदार, कार्यकर्त्यांना गृहीत धरून स्वार्थ साधला जात आहे हे कुठेतरी थांबायला हवं. 


शब्दांकन : विनायक गांवस 

छाया : साहिल बागवे