स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कसोशीने प्रयत्न करा : सुरेश साटम

जानवली केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा स्पर्धा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 07, 2023 15:25 PM
views 55  views

कणकवली : आजच्या धावपळीच्या युगामध्ये खेळांना मोठे महत्त्व आहे. खेळा सोबतच स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून राहणे व त्यातून आपल्या गाव तालुका राज्य व देशाचे नाव उज्वल करण्याची संधी आपल्याला अशा स्पर्धांमधून निर्माण होत असते. स्पर्धा ही निकोप असायला हवी. केवळ स्पर्धेमध्ये भाग घेतला मग झाले असे नाही. तर शेवटपर्यंत स्पर्धेत टिकून राहणे यासाठी प्रत्येक मुलाने शर्तीचे प्रयत्न करा. असे आवाहन साकेडी सरपंच सुरेश साटम यांनी केले. कणकवली तालुक्यातील जानवली केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सरपंच साटम बोलत होते.

यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर तरंदळे सरपंच सुशील कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष अक्षता राणे, शाळा व्यवस्थापन व ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, उपसरपंच वर्दम, केंद्र प्रमुख काळू पवार, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू सदडेकर, सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुन राणे,  सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत बांबर्डेकर, सेवानिवृत्त अभियंता दिलीप राणे, पंचायत समितीच्या माजी सदस्या अनघा देवरुखकर, ग्रामपंचायत सदस्य विशाखा राणे, प्रेरणा जाधव,  माजी सरपंच रीना राणे, तरंदळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नेहा घाडीगांवकर, जागृती सावंत, साकेडी शाळा नंबर 1 च्या मुख्याध्यापक समिधा वारंग, सकाळी उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. दीक्षा वाघमारे, केंद्र मुख्याध्यापंक शंकर बागवे, शिक्षक प्रभाकर पावसकर, उमेश मोरे, दीक्षा सावंत यांच्यासह केंद्रातील शिक्षक, मुख्याध्यापक त्यांचे पालक आदी उपस्थित होते.

 जानवली केंद्रातील 8 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा या साकेडी सरस्वती विद्यामंदिर शाळा नंबर 1 या ठिकाणी आजपासून सुरू करण्यात आल्या. हा महोत्सव गेल्या अनेक वर्षांनंतर साकेडी या ठिकाणी होत असल्याने या स्पर्धेची जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी बोलताना तरंदळे सरपंच सुशील कदम यांनी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल कौतुक केले. तसेच स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

सेवानिवृत्त अधिकारी चंद्रकांत बांबर्डेकर म्हणाले, अनेक वर्षा पूर्वी येथे स्पर्धा झाल्या होत्या. त्यावेळी आता सारख्या सुविधा नव्हत्या. आता स्वरूप बदलले. मात्र ज्या पद्धतीने उत्साहाने स्पर्धा होत आहेत ही बाब गावाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा पाया घडवला जातो. शिक्षक संस्कार करतात, व यातून मोठ्या व्यक्ती घडत असतात असे ते म्हणाले.

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अर्जुन राणे म्हणाले, विद्यार्थी दशेत असून दे किंवा आताच्या काळात देखील खेळामुळे माणूस तंदुरुस्त बनतो. खेळा मधून नाव उज्वल करण्याची संधी, असते व ही संधी प्रत्येकाने ओळखली पाहिजे. या स्पर्धेत उतरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय ठेवून काम करा. स्पर्धेमध्ये खेळत असताना विद्यार्थ्यांनी सांघिक भावना ठेवा. तुमच्या स्पर्धेतील यशामुळे गाव, शाळा, तालुका, जिल्हा राज्य व देश मोठा होईल हे ध्येय ठेवून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. या स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने एकवटलेल्या ग्रामस्थ, पालक, महिलांचं खास अभिनंदन केले पाहिजे. गावात या स्पर्धा व हा महोत्सव घेण्यासाठी सर्वांनीच एकत्र येत मेहनत घेतली असे उद्गार श्री राणे यांनी काढले.

अनघा देवरुखकर म्हणाल्या, गेल्या 33 वर्षात गावात असा कार्यक्रम झाला नव्हता. यासाठी पुढाकार घेऊन सर्वांनी एकत्र येत एकजुट दाखवली. अशा स्पर्धांमुळे भविष्यात सुजाण नागरिक घडतील.  यावेळी क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काळू पवार यांनी तर सूत्रसंचालन प्रभाकर पावसकर व आभार समिधा वारंग यांनी मांनले.