कणकवलीत भरणार दिवाळी बाजार

Edited by:
Published on: October 08, 2022 14:56 PM
views 235  views

कणकवली : दिवाळी हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि त्यामुळेच कणकवली शहरात गतवर्षीप्रमाणे यावर्षीही विशेष दिवाळी बाजार भरविण्यात येणार आहे. आमदार नितेश राणेंच्या हस्ते 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता उद्घाटन होणार असून 23 ऑक्टोबर पर्यंत हा दिवाळी बाजार सुरू राहणार असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत संगितले.

यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बंडू गांगण उपस्थित होते. हा दिवाळी बाजार नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळ आणि भाजपाचे सर्व नगरसेवक यांच्या संयोजनातून हा विशेष दिवाळी बाजार भरवला जाणार आहे. गतवर्षी दिवाळी बाजारची उलाढाल मोठी होती. बचतगटातील महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो. एसटी स्टँड लगतच्या पेट्रोल पंपासमोर हायवे ब्रिजखाली दिवाळी बाजार भरवला जाणार आहे.

चकली, करंज्या, अनारसे, शंकरपाळी आदी पदार्थांचा दिवाळी फराळ, बांबू च्या काठीपासून तयार केलेले कागदी आकाशकंदिल, कुंभारांच्या हस्तकलेतील मातीचे कंदील, मातीचे दिवे, मातीचे शो पीस, इमिटेशन ज्वेलरी, चहा, सरबत स्टॉल असे एकूण 35 स्टॉल असणार आहेत. स्टॉल आणि लाईट व्यवस्था मोफत केली जाणार आहे. स्टॉल बुकिंगसाठी समीर नलावडे मोबा. 9420206464 / मेघा गांगण मोबा. 9404448999 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.