
वैभववाडी : गावातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळी फराळासह विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायत खांबाळे आणि ग्रामसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायत खांबाळेच्या येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या हस्ते १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता होणार आहे. या दोन दिवसीय उपक्रमात गावातील विविध महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून, दिवाळी फराळासोबतच त्यांच्या हस्तनिर्मित इतर उत्पादनांची विक्री केली जाणार आहे.
‘उमेद अभियानांतर्गत’ गावात अनेक महिला बचत गट स्थापन झाले आहेत. या गटांकडून विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते, परंतु त्यांना अपेक्षित बाजारपेठ मिळत नाही. हीच गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायत खांबाळे आणि ग्रामसंघाच्यावतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत हा महोत्सव आयोजित केला आहे.या महोत्सवातून स्थानिक महिलांच्या उद्यमशीलतेला चालना मिळणार असून, त्यांच्या उत्पादनांना नवे ग्राहक मिळतील अशी अपेक्षा आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार फराळ आणि इतर वस्तू उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तालुक्यातील सर्व नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन स्थानिक महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे, असे सरपंच प्राजक्ता कदम, उपसरपंच मंगेश गुरव आणि ग्रामसेविका नयना गुरखे यांनी आवाहन केले आहे.