ओंकार मित्रमंडळातर्फे 'आनंदाचा दिवा' उपक्रम

Edited by: मनोज पवार
Published on: November 07, 2024 15:21 PM
views 141  views

राजापूर : शहरातील ओंकार मित्रमंडळातर्फे दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या पाच वस्तू कमी किंमतीमध्ये उपलब्ध करून दिल्या असून त्याचा अडीचशेहून अधिक लोकांनी लाभ घेलला आहे.त्याचवेळी   गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्यांच्या घरी दुःखद घटना घडल्या आहेत, अशा २२ कुटुंबांना तयार फराळही दिला आहे. सामाजिक ' बांधिलकीतून ओंकार मित्रमंडळातर्फे राबविलेल्या 'आनंदाचा दिवा' या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. 

शहरातील ओंकार मित्रमंडळातर्फे शहरातील विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने राबविण्यात येणार्‍या या उपक्रमांचे सर्वांकडून विशेष कौतुक केले जाते. समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे लोक आपली दिवाळी धुमधडाक्यात साजरी करताना दिसतात. त्याप्रमाणे इतरांनाही धुमधडाक्यात दिवाळी साजरी करता यावी. त्यांच्याही घरचा दिवाळीचा आनंद अधिक द्विगुणित व्हावा या उद्देशाने ओंकार मित्रमंडळाच्यावतीने 'आनंदाचा दिवा' हा नाविण्यपूर्ण उपक्रमराबविण्यात आला. 

त्यामध्ये फराळासाठी आवश्यक असलेल्या रवा, मैदा, साखर, पोहे आणि तेल अशा बाजारभावाप्रमाणे ३७० रूपयांच्या पाच वस्तू केवळ २५० रूपयांमध्ये ओंकार मित्रमंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात आल्या. त्याचा अडीचशेहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. त्याचवेळी गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये कुटुंबामध्ये दुःखद घटना घडली अशा २२ कुटुंबांना तयार फराळाचेही स्वखर्चाने वाटप करण्यात आले. 

ओंकार मित्रमंडळाचे प्रमुख विवेक (पिंट्या) गुरव आणि सहकार्यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी मोहन घुमे, तेजस गुरव, प्रभाकर गुरव, भरत गुरव, गजानन गुरव, राजू जोगळे, प्रसन्न देवस्थळी आदींनी मेहनत घेतली.  ओंकार मित्रमंडळाच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.