श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत 'दिव्यांग समता सप्ताह'

Edited by: नागेश दुखंडे
Published on: December 05, 2025 15:05 PM
views 123  views

देवगड : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत“ दिव्यांग समता सप्ताह “ विद्यार्थी,शिक्षक यांची समता जनजागृतीपर रॅली काढून उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला.समावेशक शिक्षणाची संकल्पना बळकट करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांबद्दल आदर ,संवेदनशीलता आणि समानता या मूल्यांची जाणीव करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

विद्यार्थ्यांनी हातात फलक, घोषवाक्ये घेत गांवामध्ये जनजागृती रॅली काढून “सर्वांसाठी समान संधी” हा संदेश दिला.      “दिव्यांग विद्यार्थी हे समाजाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांना समान संधी, समान आदर आणि आत्मविश्वास देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आमच्या विद्यालयात “ दिव्यांग समता सप्ताह “ हा उपक्रम राबवून संवेदनशील, करुणाशील आणि जागरूक पिढी तयार करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले.”असे प्रतिपादन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी केले.

या उपक्रमाला ज्येष्ठ शिक्षक संजय पांचाळ, सतीशकुमार कर्ले, मोहन सनगाळे, मानसी मुणगेकर, प्रदीप घाडी, विद्यार्थी, पालक तसेच स्थानिक ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल शाळा प्रशासनाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.