मुर्तीकारावर विघ्न | विघ्नहर्ता बळ देवो..!

Edited by: विनायक गावस
Published on: July 24, 2023 11:11 AM
views 1061  views

सिंधुदुर्ग : कोकणात विशेषत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी लोकांची मोठ्या प्रमाणात नुकसानं होत आहेत. अशातच वेंगुर्ला तालुक्यातील एका गणेश मुर्तीशाळेवर वडाचे झाड उन्मळून पडल्यानं तब्बल १०० हून अधिक मुर्त्यांचे नुकसान झाले आहे. 

कोकणचा, कोकणवासीयांचा उत्सव असणारा गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. सप्टेंबर महिन्यात बाप्पाच आगमन होणार असल्यानं गणेश मुर्ती शाळांत लाडक्या बाप्पाला साकारण्यासाठी वेग आला आहे. दिवस-रात्र एक करत मुर्तीकार गणेश मुर्ती तयार करण्यासाठी मेहनत घेत आहेत. अशातच विघ्नहर्ता असणाऱ्या विघ्नहर्त्यावरच संकट कोसळल आहे. वेंगुर्ला तालुक्यातील परूळे येथील सिद्धिविनायक कला मंदीर या गणेश मुर्तीशाळेवर वडाचे झाड उन्मळून पडल्यानं तब्बल १०० हून अधिक बहुतांश काम पूर्ण झालेल्या मुर्त्यांचं मोठं नुकसान झाले आहे.

गणेश मुर्तींची ही अवस्था पाहताना देखील अंगावर शहारा उभा राहतोय. त्यामुळे ज्या कलाकारान श्रम, मेहनत, कष्ट घेऊन तयार केलेल्या मुर्तीची अवस्था डोळ्यादेखत पाहताना त्याची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करण अवघड आहे. असं असताना देखील मुर्तीकार सिद्धेश तेली, हनुमंत तेली संकटान खचून न जाता पुन्हा एकदा उभी राहण्याची जिद्द उराशी बाळगून आहेत. मुर्तीकाराची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाकडून त्यांना तातडीनं मदत मिळण आवश्यक आहे. डोळ्यादेखत मोडून पडलेला संसार असताना पुन्हा उभं राहण्याच्या मुर्तीकार तेली यांच्या जिद्दीला सलाम करत असताना विघ्नहर्ता श्री गणराय त्यांना या संकटातून बाहेर पडण्याचं बळ देवो, ताकद देवो.