जिल्हा शल्य चिकित्सकपदी डॉ. श्रीपाद पाटील यांची बढती

Edited by: ब्युरो
Published on: July 05, 2023 17:42 PM
views 108  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांची पदोन्नतीने कोल्हापूर उपसंचालक या पदावर बदली झाली आहे. तर येथील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांना जिल्हा शल्य चिकित्सक पदी बढती देत शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात नियुक्ती दिली आहे. 

 डॉ पाटील यांनी शासकीय आरोग्य सेवेमध्ये २३ वर्षे आतापर्यंत सेवा बजावली आहे. यातील गेली बारा वर्षे ते सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. तर कोरोना काळात अडीज वर्षे त्यांनी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार वारंवार होता. त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदोन्नती मिळणार होती. पण मागील दोन वेळा त्यांना संधी असताना ती हुकली होती. अखेर शासनाने आता त्यांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदोन्नती दिली आहे.

यामुळे अनुभवी तसेच जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची इत्यंभूत माहिती असलेले जिल्हा शल्य चिकित्सक आता जिल्ह्याला लाभले आहेत. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ढासळलेला दर्जा डॉ पाटील सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.