
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा विकास नियोजन बैठक मंगळवारी सकाळी 11 वाजता होत असून, या सरकारच्या कालावधीतील ही अखेरची बैठक असण्याची शक्यता आहे. कारण सप्टेंबर महिन्यापासून विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यमान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील ही अखेरची बैठक असण्याची शक्यता आहे.
दरम्यान सन 2024 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत 250 कोटी रुपये एवढा निधी मंजूर झाला असून, यापैकी 85 कोटी निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत नवनिर्वाचित खासदार नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे हे उपस्थित राहणार नसल्याचे समजते तर या बैठकीमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच आमदार वैभव नाईक हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यावर्षीचा म्हणजे सन २०२४- २५ च्या २५० कोटी जिल्हा वार्षिक विकास आराखड्या पैकी 85 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील विविध विकास कामे पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहेत. १६ जुलै रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा होत असून, मागील वर्षात मंजूर कामांचा आढावा, यावर्षीतील नवीन कामांच्या मंजुऱ्या व निधी वितरणाबाबतचे निर्णय या सभेत घेतले जाणार आहेत.