
सिंधुदुर्गनगरी : राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्रितपणे सुरू आहे. या योजनेंतर्गत शासकीय आणि खाजगी रुग्णालयामार्फत पात्र लाभार्थ्यांना सूचिबद्ध आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येतात. या दोन्ही योजनांचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मिळण्यासाठी या योजनेत खाजगी रुग्णालयांचा अधिकाधिक समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची प्रथम बैठक संपन्न झाली. या मध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांच्या जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधिक्षक कृषिकेश रावले, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्हा स्तरीय पालक जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणीमध्ये आरोग्य तज्ज्ञांचा तसेच मुख्याधिकारी यांचा समावेश करावा. जनतेला अधिकाधिक चांगल्या सेवा देण्यासाठी आरोग्य मित्रांना निर्देशित करण्यात यावे. आयुष्मान कार्डचे वाटप लवकरात लवकर करावे असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधितांना दिले.
३ रुग्णालयांची उत्तम कामगिरी
या योजने मध्ये एकूण १३५६ आजारांकरिता प्रतिकुटुंब प्रतिवर्ष रु. ५ लाखा पर्यंत मोफत उपचार करण्यात येतात. योजनेमध्ये जिल्ह्यातील २७ रुग्णालये अंगीकृत आहेत. त्यातील खाजगी रुग्णालयापैकी उत्तम कामगिरी करणारे प्रथम तीन रुग्णालये एसएसपीम मेडीकल कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे (6195 लाभार्थी), संजिवनी बालरुग्णालय सावंतवाडी (1060 लाभार्थी), गुरुकृपा हॉस्पिटल कणकवली (988 लाभार्थी) यांचा समावेश आहे.
आयुष्मान कार्ड निर्मिती मध्ये जिल्ह्यात एकूण ४ लाख २३ हजार लाभार्थ्यांचे कार्ड तयार करण्यात आले असून, 52 टक्के कामासह जिल्ह्याचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. कार्ड तयार करण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड व आधार लिंक मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये कार्ड काढण्याची सुविधा मोफत उपलब्ध आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे जिल्हा प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी तसेच योजने बाबत काही समस्या, तक्रार असल्यास :
१. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना: १५५३८८/१८००२३३२२००
२. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: १४५५५/१८०००१११५६५ या क्रमांकावर नागरीकांनी संपर्क करावा असे अध्यक्ष तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचीत केले आहे.