
वेंगुर्ले : रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्यावतीने दि. 5 व 6 एप्रिल रोजी वेंगुर्ले कॅम्प येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भव्य अशी चॅम्पियन्स बॅडमिंटन लीग (CBL) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष योगेश नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
वेंगुर्ले शहरातील शिरोडकर कंपाऊंड येथील रोटरी क्लबच्या कार्यालयात चॅम्पियनशिप बॅडमिंटन लीग स्पर्धेच्या माहितीसाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस उपस्थित मान्यवरात रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश नाईक, सचिव अँड. प्रथमेश नाईक, रोटरी सदस्य अनमोल गिरप, पंकज शिरसाट, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, राजेश घाटवळ, रोटरीचे माजी अध्यक्ष राजू वजराटकर, मृणाल परब यांचा समावेश होता.
या स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. 5 एप्रिल रोजी दुपारी 12 वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या हस्ते व रोटरी क्लबचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेचे इव्हेंट चेअरमन म्हणून अनमोल गिरप हे काम पाहणार आहेत.
रोटरी क्लब हा नेहमीच विविध खेळांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने खेळ आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते. गतवर्षी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करून असेच प्राधान्य दिले होते. यावर्षी बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चॅम्पियन बॅडमिंटन लीग (CBL) या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॅडमिंटन लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. असे या पत्रकार परिषदेत रोटरी पदाधिकारी तथा माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी स्पष्ट केले.
या स्पर्धेत नामवंत खेळाडूंचा सहभाग असणार असून सदर खेळाडूंची निवड हि निवड प्रक्रियेतून प्रत्येक संघात 10 खेळू निवडले जाणार आहेत. यात सर्व गटातील खेळाडूंचा सहभाग असणार आहे. सदर स्पर्धेत एकूण 8 संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या 8 संघात वेंगुर्ला वायपर्स, मॅजिक टच वेंगुर्ला, के.एन. के. स्मॅशर्स कणकवली, दोडामार्ग डायमोनोज, स्मॅशिंग लायन्स सावंतवाडी, कुडाळ ग्लॅडीएटर्स, सेवन ए.एम. कुडाळ, बॅडमिंटन लवर्स वैभववाडी अशा आठ संघाचा समावेश असणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघास रोख रुपये 30 हजार व उपविजेत्या संघास रोख रुपये 20 हजार तसेच कायमस्वरूपी चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. याबरोबरच इतर वैयक्तिक विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. यात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी या स्पर्धेचे इव्हेंट चेअरमन अनमोल गिरप- 9768728007 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन तर्फे करण्यात आले आहे.