
सिंधुदुर्गनगरी : ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न्न झाली.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, वैध् मापन विभागाचे मिलींद पावसकर, कृषी उपसंचालक कार्यालयाचे ज्ञानेश्वर बडे, परिवहन विभागाचे अमित नायकवडी आदी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी अशासकीय सदस्य दिवंगत सीताराम कुरतडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
बैठकीमध्ये अशासकीय सदस्यांनी रस्त्यावरील झाडे पावसाळ्यात तोडली जातात परंतु तोडलेल्या फांद्या तशाच लोंबकळत ठेवतात अशी तक्रार केली. यावर सदस्य सचिवांनी झाडे तोडण्यासाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावरील फांद्या बाजूला करुन मार्ग मोकळा करण्याबाबत आदेशित करावे असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना निर्देशित केले. तसेच पेट्रोल पंपावरील शौचालयांमध्ये स्वच्छता ठेवावी, पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, दूरसंचार सेवामध्ये सुधारणा करावी, ग्रामीण भागात नेटवर्क सुविधा उपलब्ध करुन द्यावी, लाईन टाकण्याची कामे पूर्ण झाल्यावर खराब झालेले रस्ते तात्काळ दुरूस्त करुन घ्यावेत, गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर चाकर मानी जिल्ह्यात येतात अशा वेळी बस स्थानके स्वच्छ ठेवावीत, तेसच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहिल याची दक्षता घ्यावी असेही जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना सांगितले.
बैठकीत विविध विषयांवरील चर्चेत अशासकीय सदस्य अशासकीय सदस्य आनंद मेस्त्री, प्रा. सुभाष गोवेकर, तेजस साळुंखे, अरुण लाड, विष्णुप्रसाद दळवी, जयराम राऊळ, ॲङ नकुल पार्सेकर, शेतकरी प्रतिनिधी महेश संसारे यांनी सहभाग घेतला.