
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी डॉ. अनिल पाटील यांनी हेवाळे येथे रमेश ठाकूर यांच्या शेतात ट्रॅक्टर चालवून शेत नांगरणीचा आनंद सुट्टीच्या दिवशी लुटला. तसेच हेवाळे जंगल परिसरातील दुर्मिळ वन्यप्राणी व वनस्पती याची पाहणी केली. देवराई परिसरात चिखल व गवत असलेल्या पाण्यातून अनवाणी भ्रमंती केली. आधुनिक तंत्रज्ञानासह वेगवेगळी बी बियाणे वापरून शेतकऱ्यांनी विकासात्मक शेती करावी, तसेच ग्रामीण भागात पर्यटनाला वाव असून शेतकरी व नवोदित तरुणांनी पुढाकार घेऊन चालना द्यावी तसेच फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावे तसेच काजू उत्पादन बरोबर प्रक्रिया उद्योग सुरू करावेत असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
यावेळी परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी लक्ष्मण कसेकर, दोडामार्ग महसूल विभागाचे श्री. पास्ते, हेवाळे ग्रामस्थ सचिन देसाई, दत्ताराम देसाई, वन्य प्राणी अभ्यासक श्री. ठाकूर, पाल पुनर्वसन पोलीस पाटील सौ. संगीता देसाई, शेतकरी रमेश ठाकूर, सुरेश ठाकूर तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी शेतीबाबत माहिती जाणून घेतली. शेतकरी उन्हातान्हात, पावसात कष्टाने शेती करतात. त्यामुळेच आपल्याला अन्न मिळते. शेतकरी हा महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
हेवाळे गावात देवराईत असलेली वनस्पती व अन्य दुर्मिळ प्राणी, पक्षी यांची माहिती घेतली. यावेळी वन्यप्राणी अभ्यासक राहुल ठाकूर, पत्रकार सुहास देसाई यांनी याबाबत विस्तृत माहिती दिली.