जिल्हा बँक अॅक्शन मोडमध्ये !

बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या अडीअडचणीबाबत सभेचे आयोजन
Edited by: संदीप देसाई
Published on: December 21, 2023 16:42 PM
views 42  views

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या अडीअडचणीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत नुकतीच सर्व नागरी व ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांची सभा पार पडली. बँकेच्या सभागृहात ही सभा आयोजित केली होती. या सभेस पतसंस्थांचे प्रतिनिधी बँकेचे अध्यक्ष व बँकेचे संचालक सुशांत नाईक व विठ्ठल देसाई हेही उपस्थित होते. यावेळी संस्थांचे अडीअडचणी वर सविस्तर चर्चा करण्यात आली.                        

आपल्या जिल्ह्यात असणाऱ्या पतसंस्थांबरोबर अन्य जिल्ह्यातील पतसंस्था तसेच काही मल्टीस्टेट पतसंस्था जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये बँका व पतसंस्थांची स्पर्धा सुरू असून या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पतसंस्थांनी आपले कामकाज गतिमान करणे आवश्यक आहे. पतसंस्थांच्या कर्ज वसुलीसाठी यापूर्वी जिल्हा फेडरेशन करून कर्मचारी उपलब्ध होत होते. परंतु सद्यस्थितीत कर्मचारी नसल्याने कर्ज वसुलीला अडचणी येत आहेत. यासाठी संस्थांच्या मागणीनुसार संस्थांचे थकबाकीदार कर्जदार यांच्याबरोबर १०१ दाखल केलेले असल्यास बँकेकडून संस्थाना वसुलीसाठी मदत करण्याची ग्वाही मनिष दळवी यांनी यावेळी दिली.                        

काही पतसंस्थांचे कार्यक्षेत्र त्या-त्या तालुक्यापुरते मर्यादित असल्याने पतसंस्थांच्या व्यवसाय वाढीवर निर्बंध येत आहेत. यासाठी संबंधित संस्थांनी आपले कार्यक्षेत्र वाढीसाठी किमान २ ते ३ तालुक्यांचे प्रस्ताव सहकार खात्याकडे सादर करावेत, संस्थांनी आधुनिक तांत्रिक क्षमतेची जोड घेणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेऊन प्रशिक्षण आयोजित करावे अशी सूचना सर्व संस्थांनी केली. माहे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात  जिल्हास्तरीय प्रशिक्षण बँक आयोजित करेल. त्यामध्ये सर्व संस्था प्रतिनिधींनी सहभागी व्हावे. संस्थांच्या सर्व कर्मचाऱ्यांनी टप्प्या-टप्प्याने प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. संस्थाना उद्भवणाऱ्या अडीअडचणीबाबत वर्षातून किमान १ ते २ वेळा सर्व संस्थांनी एकत्र यावे, त्या अनुषंगाने हॉल व अन्य सुविधा बँक उपलब्ध करून देईल अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली. याप्रसंगी बँकेने घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्व संस्थांनीही समाधान व्यक्त केले.