
सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना जिल्ह्यातील आंबा काजू व केळी या पिकासांठी राबवली जाते व जिल्ह्यातील बागायतदार या योजनेत सहभागी होत असतात. सदर योजनेच्या अनुषंगाने शासनाने सन २०२१-२२ व २०२२-२३ व २०२३-२४ या कालावधीसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.हि कंपनी नियुक्त केलेली आहे. गतवर्षीच्या हंगामातील पीक विमा पोटी अद्याप काही ठिकाणी रक्कम प्राप्त होणे बाकी आहे.तसेच चालू वर्षासाठी ३०नोव्हेंबर पर्यंत या योजनेत शेतक-यांनी सहभागी व्हायचे आहे. हवामान पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या ब-याच अडचणी आहेत. जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी,कृषी विभाग विमा कंपनी व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांची एकत्रित सभा शनिवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी तीन वाजता बँकेच्या प्रधान कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
या सभेस रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व कृषी अधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी या सभेस जिल्ह्यातील बागायतदार शेतक-यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.