
वैभववाडी : समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अभियानांतर्गत तालुक्यातील १७दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या हस्ते हे साहित्य वितरीत करण्यात आले.
तालुक्यातील अंगणवाडी ते इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्याकरिता ही साहित्य साधने वितरित करण्यात आली. यामध्ये एअर बेड, कॉर्नर सिटिंग, थेरपी बॉल,सेंसरी किट, वाॅकर, एम आर किट तसेच अल्पदुष्टीधारक विद्यार्थ्यांकरिता लो-व्हीजन किट आणि बौद्धिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्याकरिता अध्ययन सुलभ होण्याच्या दृष्टीने एम आर किट व शैक्षणिक साहित्य, विविध पझल किट इत्यादी साहित्य मोफत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी पालकांना विविध साहित्य हाताळणी व वापर बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला दिव्यांग विद्यार्थी, पालक व समावेशित शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला विशेष शिक्षक. दत्तात्रय तापेकर विशेषतज्ञ महेश प्रभाकर, वैदही पिळणकर, विषय साधन शिक्षक स्नेहल रावराणे, तानाजी कांबळे, स्वरा जाधव आदी उपस्थित होते.