
वैभववाडी : महाराष्ट्र शासनाच्या मानव विकास योजनेअंतर्गत येथील अर्जुन रावराणे विद्यालयात मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संस्थेचे अधीक्षक तथा स्थानिक कमिटी अध्यक्ष जयेंद्र रावराणे व वैभववाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या हस्ते सदर कार्यक्रम संपन्न झाला.
अर्जुन रावराणे विद्यालय, कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल या तिन्ही विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या गरजू मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आल्या. दुर्गम भागातील विद्यार्थिनींचा शाळेचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता संस्थेच्या मागणीनुसार शासनाने या सायकल पुरविल्या आहेत.
शासकीय योजनांचा जास्तीत जास्त फायदा प्रशालेतील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे देण्यात येईल, या बाबतीत संस्था नेहमीच प्रयत्नशील असेल असे मत संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यातील ही एकमेव शाळा असेल जी सर्व शासकीय योजना व सामाजिक उपक्रम राबवते. शासकीय योजनांची माहिती लोकांना व्हावी, यासाठी आठवडा बाजाराचे औचित्य साधून नवीन मोफत वितरण केलेल्या सायकल व लाभार्थी विद्यार्थिनींनी बाजारपेठेतून फेरी काढली.
यावेळी संस्था अधीक्षक जयेंद्र रावराणे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर, तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व लाभार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक तसेच प्रशालेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.