
सावंतवाडी : 'अनाथांचा आधार बनणे हीच खरी ईश्वरसेवा आहे' या शिकवणुकीनुसार काम करणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सावंतवाडी तालुक्यातील निरवडे येथील 'लिटिल सिस्टर्स ऑफ द पुअर' या वृद्धाश्रमातील गरजू वृद्धांसाठी १२ हजार रुपयांच्या वस्तूंचे वाटप केले आहे. यामध्ये डायपर, डेटॉल आणि रूम क्लिनिंगसाठी लागणाऱ्या वस्तूंचा समावेश होता.
या वृद्धाश्रमातील सिस्टर अनिता रोस यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा गौंडर आणि रवी जाधव यांच्याकडे काही अत्यावश्यक वस्तूंची मागणी केली होती. त्यानुसार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन हा मदतीचा हात पुढे केला. या आश्रमात ७५ ते ८० वयोगटातील वृद्ध महिला आणि पुरुष वास्तव्यास आहेत. त्यापैकी अनेकजण अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांना चालता येत नाही. सिस्टर त्यांची काळजी घेतात, औषधपाणी देतात आणि त्यांचे डायपर नियमितपणे बदलतात. त्यामुळे डायपरचा खर्च खूप मोठा असतो. याच गरजा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने त्यांना आवश्यक वस्तू पुरवल्या.
याआधीही प्रतिष्ठानने या आश्रमाला जीवनावश्यक वस्तू देऊन मदत केली होती. याशिवाय, प्रतिष्ठानने येथील एका वृद्ध महिलेच्या डोळ्याचे ऑपरेशन डॉ. तळेगावकर यांच्या मदतीने मोफत करून दिले होते. प्रतिष्ठानच्या या सेवाभावी कार्याची सिस्टर अनिता रोस यांनी प्रशंसा केली आणि उपस्थित सदस्यांचे आभार मानले.या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रूपा गौंडर, शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम आणि रवी जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.