सिंधुदुर्गात ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स - स्वेटर्स वाटप

एसबीएच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टचा उपक्रम
Edited by:
Published on: December 19, 2024 17:30 PM
views 295  views

कणकवली : मराठवाड्यातील बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातून सिंधुदुर्गात ऊसतोडीसाठी आलेल्या ऊसतोड कोयता कामगारांना सामाजिक जाणिवेतून एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्ट मार्फत माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई व उद्योजिका अदिती सावंत ह्यांच्या हस्ते ब्लँकेट्स व स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. याबद्दल ऊस कामगारांकडून आभार मानण्यात आले.

यावेळी संजय देसाई यांनी ट्रस्टच्या कामांचे कौतुक करताना, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, सरकार त्यांच्यासाठी राबवित असलेल्या विविध योजना ह्यांची माहिती दिली. उद्योजिका अदिती सावंत यांनी आपल्या छोटेखानी भाषणात स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच ऐन थंडीत ऊसतोड कामगारांना ब्लँकेट्स व स्वेटर्सचे वाटप एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टने पुरस्कृत केल्याबद्दल समाजसेवक सचिन वंजारे ह्यांनी सर्व ऊसतोड कामगारांच्यावतीने ट्रस्टचे आभार मानले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य अतुल सावंत यांनी केले. ह्या प्रसंगी एस बी एच स्टाफ असोसिएशन वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त बी एस सावंत, ऊसउत्पादक शेतकरी अभिजित सावंत तसेच समाजसेवक जयेश सावंत, नंदकिशोर सावंत व अथर्व सावंत  उपस्थित होते. कासार्डे गावातील सुप्रसिद्ध यूट्युबर नवनाथ तोरस्कर ह्यांनी कार्यक्रमाचे चित्रीकरण केले.