LIVE UPDATES

१०० वट वृक्षांचे वाटप

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 10, 2025 20:15 PM
views 57  views

सिंधुदुर्गनगरी : वडासारखा महत्त्वपूर्ण वृक्ष आपण जतन केला पाहिजे. झाडांच्या फांद्या तोडून पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यापेक्षा प्रत्येकाने वृक्षाची लागवड करून त्याची काळजी घेऊन त्याचे संवर्धन करत पर्यावरण रक्षणास हातभार लावणे आज काळाची गरज आहे.  त्या अनुषंगाने आपला हा एक छोटासा प्रयत्न आहे अशाच रीतीने प्रत्येक वटपौर्णिमेच्या दिवशी वृक्ष संवर्धनाचे आपले कर्तव्य प्रत्येकाने लक्षात ठेवून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीत हातभार लावावा असे प्रतिपादन करत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अशा प्रकारच्या वेगळ्या वटपौर्णिमा सणाचे आयोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून वटवृक्षाचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आगळ्यावेगळ्या वटपौर्णिमा सणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी  जिल्हाधिकारी  अनिल पाटील ,  सुनिता पाटील, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी भूसंपादन शारदा पोवार, तहसीलदार पुनर्वसन शितल जाधव, चैताली सावंत, तहसीलदार महसूल, माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी व इतर विभागाच्या महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रास्ताविकात या कार्यक्रमाच्या आयोजनामागचे महत्त्व उपजिल्हाधिकारी शारदा पोवार यांनी सांगितले. त्या म्हणाल्या वटपौर्णिमा सणासाठी वडाच्या फांद्या तोडून त्याचे पूजन करण्यापेक्षा आजच्या सणाचे औचित्य साधून वडाच्या झाडाचे रोपण प्रत्येकाने केल्यास निसर्गाचे संतुलन साधण्यास आपण हातभार लावू त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे शारदा पोवार यांनी सांगितले.

निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई यांनी वडाच्या झाडाचे जसे आध्यात्मिक पौराणिक महत्त्व आहे तसेच त्याला आयुर्वेदिक दृष्ट्या देखील फार महत्त्वपूर्ण स्थान आहे त्यामुळे वडाच्या झाडाचे संवर्धन होणे ही काळाची गरज बनली आहे. या सणाचे औचित्य साधून वृक्षांचे संवर्धन करणे, वृक्षाचे संगोपन करणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. वृक्ष संगोपनाचे हे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवणे हा या आयोजनामाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हाधिकारी  यांच्या अर्धांगिनी सुनिता पाटील  उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या जिल्हा प्रशासनातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांनी राबवलेला हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे.  हा उपक्रम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यातून इतरांनी देखील प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारचे उपक्रम ठीक ठिकाणी साजरे व्हावे असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले तर आभार प्रदर्शन चैताली सावंत तहसीलदार महसूल यांनी केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित महिला वर्गाने विविध गुणदर्शन पर कार्यक्रम देखील सादर केले.उपस्थित मान्यवर आणि सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना या निमित्ताने वट वृक्षाचे रोप वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तसेच सिंधुदुर्ग नगरी प्राधिकरण क्षेत्रात वट वृक्षाचे रोपण  जिल्हाधिकारी यांच्या अर्धांगिनी श्रीमती सुनिता पाटील यांचे हस्ते करण्यात आले. वट वृक्षाचे पूजन देखील या निमित्ताने करण्यात आले.अशा रीतीने वटपौर्णिमा सण हा एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांच्या संकल्पनेतून आज साजरा करण्यात आला.