मातोंड येथे रस्त्याच्या कामावरून मुकादम व ग्रामस्थांच्यात वाद ; पोलिसांची मध्यस्ती

Edited by: दिपेश परब
Published on: February 26, 2023 15:05 PM
views 699  views

वेंगुर्ले: 

वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथे मातोंड चव्हाटा ते सावंतवाडा या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत असलेल्या रस्त्याच्या साईड पट्टी व दगडुजीचे चे काम सुरू असताना याठिकाणी निकृष्ट सुरू असलेले दगडुजीचे काम ग्रामस्थांनी थांबवल्यानंतर येथे असलेल्या मुकादम ग्रामस्थांना युद्धट उत्तरे देत त्यांच्या अंगावर धावून गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी मुकादम व कामगारांना घेराव घातला. दरम्यान हा वाद वेंगुर्ला पोलीस स्थानकात गेल्यानंतर पोलिसांकडून हा वाद मिटवण्यात आला मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी येऊन या कामाची पाहणी करत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यानुसार पुढील काम बंद ठेवण्यात आले. 

   मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मातोंड येथील मातोंड चव्हाटा ते सावंतवाडा या रस्त्याचे काम सुमारे ५ वर्षे सुरू आहे. २०२२ मध्ये या रस्त्याच्या उर्वरित कामाला ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली. दरम्यान यावेळी भर पावसात रस्त्यावर पाणी साचलेले असताना या रस्त्याच्या कार्पेट चे काम करण्यात आले. यामुळे काही महिन्यातच या रस्त्यावर काही ठिकाणी संपूर्ण खडी बाहेर येऊन खड्डे पडले. वेळोवेळी ग्रामस्थांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पुन्हा रस्त्यावर कार्पेट मारण्याची मागणी केली होती. याबाबत  नुकतीच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता श्री बामणे यांची येथील लोकप्रतिनिधी यांनी भेट घेऊन हा प्रकार निदर्शनास आणून कामाची पाहणी करण्याची मागणी केली. 

   सध्या या रस्त्याच्या साईडपट्टीचे काम सुरू असताना अधिकारी पाहणीसाठी येणार हे लक्षात आल्यावर या रस्त्याच्या दगडुजीचे काम करण्यास ठेकेदाराने घाईघाईने सुरुवात केली. मात्र यातही हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी हे काम थांबवले. तर यावेळी याठिकाणी असणाऱ्या मुकादमाने ग्रामस्थांसोबत अरेरावी ची भाषा करत उद्धट उत्तरे दिली व गाडी मधेच रस्त्यात लावून एसटी बस सहित इतर वाहतुकीला अडथळा निर्माण केला. यावेळी ग्रामस्थांनी संतप्त होत येथील मुकादमासहित कामगारांना घेराव घातला.

    दरम्यान हा प्रकार वेंगुर्ले पोलिसात गेल्यानंतर यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, महिला पोलीस प्रज्ञा मराठे व पोलीस कर्मचारी यांनी त्याठिकाणी दाखल होत ग्रामस्थ व कामगारांच्या बाजू ऐकून घेऊन हा वाद मिटवला. मात्र जोपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी येऊन या कामाची पाहणी करत नाहीत तोपर्यंत काम बंद ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यानुसार पुढील काम बंद ठेवण्यात आले आहे. यावेळी मातोंड तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम परब, माजी उपसरपंच सुभाष सावंत, सामाजिक कार्यकर्ते आनंद परब, सुनील परब, जगदीश परब, विजय सावंत, काका सावंत, सोसायटी संचालक पप्पू सावंत, ग्रामस्थ नंदू परब, बंड्या तिरोडकर यांच्यासाहित ग्रामस्थ उपस्थित होते.