काजू बी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव !

प्रक्रिया उद्योगांच्या कमतरतेमुळे बोंडू फेकून देण्याची वेळ
Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 28, 2024 13:34 PM
views 126  views

देवगड : देवगड तालुक्यात यंदा बदलते वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे यावर्षी काजू पिकावर किड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. यामुळे काजूपिक अत्यल्प आले आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्याच बरोबर शेतकऱ्याचा मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

काजू पीक हे नगदी उत्पन्न देणारे साधन आहे. आंबा व काजू या दोन पिकांवर त्याचे अर्थकारण अवलंबून आहे. यावर्षी वातावरणातील बदल, निसर्ग आणि अवकाळी पाऊस या सर्वांचा परिणाम काजू व आंबा पिकाच्या फलधारणेवर झालेला दिसून येत आहे. यावर्षी १५ – २० टक्के इतकेच पिक आहे. त्यातच काजू पिकावर किड रोगाचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव झाला असल्याने काजू बी च्या मध्यभागी डोळ्याजवळ किडीने शिरकाव केला आहे. त्यामुळे काजू बी काळी पडत आहे. अशा काजू बी विक्रेते घेत नाहीत. तसेच यावर्षी काजूपिकाचे उत्पादनही खूपच कमी आहे. तरीही काजू बी ला हमी भाव नसल्यामुळे शेतकरीवर्गात मोठी नाराजी पसरली आहे.

काजू बागेची साफसफाई, काजूच्या झाडांना खते, फवारणीसाठी महागडी औषधे, कामगारांची मजूरी यासाठी शेतकऱ्यांना भरमसाठ खर्च येतो. त्यातच काजूचे उत्पादन अत्यल्प असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच काजूबोंडूवर प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतक-यांना बोंडू फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.त्यामुळे शेतक-यांना बोंडू विक्रीतून आर्थिक मदत मिळण्याची आशा नाही.या समस्यांकडे व्यावसायिक दृष्टिने लक्ष देण्यासाठी नवीन उद्योजक पुढे येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतक-याना काजू बोंडूपासून थोडीफार आर्थिक मदत होईल.तरी या शेतकऱ्यांच्या काजूपिकास हमी भाव देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गात होत आहे.