
दोडामार्ग : दोडामार्ग महावितरणच्या कार्यालयात नव्याने दाखल झालेल्या उपकार्यकारी अभियंता विशाल हत्तरगी यांचे नगरसेवक संतोष नानचे व व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेत स्वागत केले. यावेळी दोडामार्ग शहरातील व तालुक्यातील सततच्या जाणाऱ्या वीज समस्येवर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना नानचे म्हणाले की, दोडामार्ग शहरासह तालुक्यात सतत विजेचा लंपडाव सुरूच असतो त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांचा व ग्राहकांचा देखील रोष महावितरणला सोसावा लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात चांगली सेवा मिळणे आम्हा सर्व शहरवासीयांना आपल्याकडून अपेक्षित असल्याचे नानचे म्हणाले.
त्यावेळी बोलताना नूतन उपकार्यकारी अभियंता हत्तरगी म्हणाले की, आपण नुकताच कार्यभार स्वीकारला असून आपण तालुक्यात येणाऱ्या सर्व लाइन तपासल्या आहेत. त्याशिवाय कोणत्या भागात जास्त समस्या उद्भवतात त्याचाही अभ्यास आपण केला आहे. सध्या आडाळी एमआयडीसीत नवीन सबस्टेशनचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या बाजूने विद्युत्त पोल टाकून सबस्टेशनपर्यंत वीज आणून ते कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरू आहे. या संदर्भात एमआयडीसी अधिकारी व आपली बैठकही नुकतीच संपन्न झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे इन्सुली येथून जंगल भागातून येणारी वीज खंडित झाल्यास तोपर्यंत आडाळी एमआयडीसीतून वीज पुरवठा सुरळीत ठेवता येईल असेही हत्तरगी म्हणाले.
इन्सुली येथून येणाऱ्या लाईनची दुरुस्तीचे कामे सुरू
इन्सुली येथून दोडामार्ग तालुक्यात येणारी वीज ही पूर्णतः जंगल भागातून येते त्यामुळे पावसात वादळी वाऱ्यामुळे या भागातील झाडे तुटून पडतात. परिणामी दोडामार्ग तालुक्याचा वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे पावसाच्या अगोदर ही पूर्ण लाइन सुरळीत ठेवण्यासाठी जोरदार काम सुरू केलेले आहे. आपण तसे नियोजन देखील केले असून येणाऱ्या तीन ते चार दिवसांत ते काम पूर्ण केले जाईल असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.
महालक्ष्मीची वीज दोडामार्ग शहराला देण्यासाठी प्रयत्न करू
महालक्ष्मी कंपनीची साटेली – भेडशी पर्यंत वीज आलेली आहे. ती स्वतंत्र फिडर टाकून जर दोडामार्ग शहराला देण्यात यावी यासाठी आपण गेल्या चार पाच वर्षांपासून मागणी करत आहे. ही लाइन वीजघर दोडामार्ग मार्गालगत स्वतंत्र फिडर टाकून दोडामार्ग शहराला मिळावी अशी मागणी आपण केली होती. त्यावेळी हत्तरगी म्हणालेत की, येणाऱ्या काळात प्राधान्याने यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणालेत. तसेच आडाळी एमआयडीसीतील सबस्टेशन, इन्सुली त्याशिवाय महालक्ष्मीची वीज अशाप्रकारे तीन पर्याय जर शहराला मिळाले तर एकाला काही समस्या उद्भवल्यास दुसरा पर्याय निवडता येईल जेणेकरून वीज पुरवठा खंडित होणार यासाठी आपण प्रथमतः प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी हत्तरगी म्हणालेत.
आम्ही सहकार्य करू : संतोष नानचे
महावितरणला जेव्हा काही कामांसाठी निधीची आवश्यकता लागेल त्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे नानचे म्हणाले. तसेच महावितरणला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही व्यापारी देणार असल्याचे नानचे यांनी स्पष्ट केले. यावेळी तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट, सुधीर चांदेलकर, फोंडू हडीकर, विशांत परमेकर, सुमंत मणेरीकर, शिवम पांचाळ, संतोष बोर्डेकर आदी उपस्थित होते.
भूमिगत मुख्य वीज वाहिन्यांचा प्रस्ताव पाठविला
मागील आठवड्यात पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेत दोडामार्ग शहरात येणारी मुख्य वीज वाहिनी भूमिगत करून मिळावी अशी मागणी आम्ही केली असून पालकमंत्री राणे यांनी यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तुम्ही या संदर्भातील प्रस्ताव पाठविला आहे का याबाबत नानचे यांनी विचारणा केली असता हत्तरगी म्हणाले की, आम्ही तसा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविला आहे. त्यामुळे तोही प्रश्न लवकरच निकाली लागेल असेही हत्तरगी म्हणालेत.