दिव्यांग भगिनींच्या मदतीला धावला दिव्यांग भाऊ !

त्यांचे दुःख जाणू शकतो : विनोद धुरी
Edited by: विनायक गांवस
Published on: June 25, 2024 06:27 AM
views 159  views

सावंतवाडी :  सावंतवाडीतील दिव्यांग डिमेलो भगिनींवर ओढावलेल्या परिस्थितीबाबत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनानंतर मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. वैभववाडी येथील प्राध्यापकानंतर स्वतः दिव्यांग असणारे विनोद धुरी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

काळसे गावातील अतिशय गरीब कुटुंबातील विनोद धुरी हे काळसे पंचक्रोशी अपंग संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते स्वतः दिव्यांग असून त्यांना चालता येत नाही. परंतू दिव्यांग भगिनींच्या मदतीसाठी ते पुढे सरसावले आहेत. काळसे गावावरून ते सहकाऱ्यांच्या मदतीने सावंतवाडी येथे आले. त्या तीन दिव्यांग भगिनींची भेट घेऊन जवळपास दोन महिने पुरेल अशा जीवनावश्यक वस्तू दिल्या. धुरी हे अतिशय गरीब  कुटुंबातील असून सुद्धा त्यांनी अनमोल दान दिले आहे. जेव्हा जेव्हा माझी मदत लागेल त्यावेळी तुम्ही मला कळवा मी आपल्याला अवश्य मदत करेन. तुमचं दुःख मी जाणू शकतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

घरात अंथरूण- पांघरून नाही हे पाहून त्या दिव्यांग भगिनींसाठी तीन गाद्या, बेडशीट, चटई व कपडे येत्या आठ दिवसात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी संस्था दिव्यांगाने दिव्यांगांसाठी चालवलेली एक संस्था आहे. गेली अकरा वर्ष आपण दिव्यांगांसाठी जीव तोडून काम करतो. त्यासाठी मला माझे सहकारी दिव्यांग मित्र अनिल पाटील ,विनायक चव्हाण, उर्मिला चव्हाण व निलेश हडकर यांचे नेहमीच मोलाचे  सहकार्य लाभते. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे मदत करू असे ते म्हणाले. 

याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर ,रवी जाधव ,रूपा मुद्राळे व रमिजा दुर्वेश उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीचे उपाध्यक्ष शैलेश नाईक यांनी विनोद धुरी यांच्या दातृत्वासाठी आभार मानले.