जि. प. सीईओंची धडक कारवाई

लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट नोटीस
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: March 29, 2025 10:58 AM
views 455  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील प्रशासकीय कारभारात सुधारणा व्हावी व जनतेची कामे सुलभ व्हावीत म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी धडक पाऊल उचलले आहे. कार्यालयीन साफसफाई बरोबरच अनेक विभागांची झाडाझडती त्यांनी सुरू केली आहे. शुक्रवारी तब्बल ५४ कर्मचारी विलंबाने आल्याचे रंगेहात सापडले असून या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासकीय राजवटीतील अधिकार सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी वापरल्याने या कार्यापद्धतीबाबत चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

जिल्हा परिषदेतील कार्यालयीन कामकाज सकाळी १०.  वाजता सुरू असताना ५४ कर्मचारी विलंबाने आल्याचे उघड झाले. प्रत्येक विभागात सकाळी १०  वाजता आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यात आली. यामध्ये विलंबाने आलेले कर्मचारी अलगद सापडले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपल्या विरुद्ध का कारवाई करू नये आपले वेतन का कपात करू नये अशा आशयाची नोटीस तातडीने या कर्मचाऱ्यांना बजावली. त्यामुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. 

दोन दिवसांपूर्वी जि प मधील सर्व विभागांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आकस्मिक भेटी दिल्या होत्या. प्रशासकीय राजवटीमुळे त्यांच्याकडे सर्व अधिकार असून जिल्हा परिषदेतील अशी झाडाझडती गरजेची बनली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे लोकनियुक्त लोकप्रतिनचा अंकुश जिल्हा परिषदांवर नव्हता. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये अंकुश नसलेले प्रशासन जाणवत होते. कामाचा निपटारा व जनतेला सुविधा देताना  दिरंगाई होत होती. रवींद्र खेबुडकर यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर जनतेला गतिमान प्रशासकीय सेवा व  दिरंगाई न होता जनतेची कामे होतील असे जाहीर केले होते. त्यानंतर सर्व विभागांची झाडाझडती त्यांनी हाती घेतली. 

आरोग्य शिक्षण कृषी पाणीपुरवठा स्वच्छता आधी सर्वच विभागांना त्यांनी सतर्क केले आहे. जनतेची कामे प्रलंबित राहणार नाहीत यासाठी दक्ष राहावे असे आदेश दिले आहे. कार्यालयाची रचना व कार्यालयांची साफसफाई याकडेही त्यांनी लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. मोठा खर्च करून बसवलेला जनरेटर सेट बसविल्यापासून गेले अनेक महिने बंदावस्थेत होता. त्यामधील तांत्रिक बाबी दूर कराव्यात असे आदेशही त्यांनी आज दिले आहेत. त्यामुळे बाह्य व अंतर्गत विद्युत कामाची डागडुजी सुरू होती. चहापानासाठी उपहारगृहात रेंगाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या शुक्रवारी फार कमी जाणवली. 

आर्थिक अपहार,कामचुकारपणा व कोणतेही कारण न देता रजेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाईचे प्रस्ताव सादर करावेत असे आदेशही रवींद्र खेबुडकर यांनी दिल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. या बेशीस्त कर्मचाऱ्यांवरील कारवाई आता अटळ असून अशा कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. 

जनतेची अडवणूक करणाऱ्या ग्रामसेवकांवर लक्ष ठेवा : मंत्री नितेश राणे

राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपण लोकांचे सेवक असून अधिकारी आणि कर्मचारी ही लोकसेवक आहेत. जनतेची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आहे. याबाबत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपापल्या यंत्रणांकडून जनतेची कामे तत्परतेने पूर्ण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. गुरुवारी पालकमंत्री जनता यांच्या संपर्क कार्यालयातील भेटी दरम्यान ग्रामसेवकांच्या काही तक्रारी समोर आल्या होत्या. अशा तक्रारींची मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दखल घ्यावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते.