
दोडामार्ग : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळकट नं. 1 च्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई दिंडी काढून भक्तीभावाने वारकरी संप्रदायाची परंपरा जपली. विविध अभंगांवर ताल धरत, टाळ-मृदंगाच्या गजरात ही दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली. दिंडीची सुरुवात शाळेतून झाली आणि ती गावातील सप्ताह विठ्ठल मंदिर येथे पोहोचली. मंदिरात विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले व हरिपाठ, अभंग गात भक्तिरसात तल्लीन झाले. या पवित्र क्षणी ग्रामस्थ व पालकांनीही मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल, रुक्मिणी, वारकरी, तुळस आदींच्या वेशभूषेत सहभाग घेतला होता. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालून निघाला. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक जनार्दन पाटील, तसेच शिक्षक गोरख जगधने आणि कमलाकर राऊत यांनीही या भक्तिमय दिंडीत सक्रिय सहभाग घेतला. या दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक जाणीव रुजली असून, वारकरी परंपरेचे महत्त्व समजून घेण्याची संधी त्यांना मिळाली. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.