उभादांडा येथील दिक्षा चौकेकर हिची आत्महत्या नसून घातपात

माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांचा आरोप
Edited by: दिपेश परब
Published on: February 11, 2024 14:28 PM
views 52  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथे राहणाऱ्या व वेंगुर्ला पंचयत समिती मध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ दिक्षा चौकेकर हिने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाला आहे, असा आरोप तिचा भाऊ सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी केला आहे. आणि वेंगुर्ले पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

शनिवार 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास राहत्या घराच्या गच्चीवर पिवळ्या नायलॉनच्या दोरीने सौ दिक्षा चौकेकर यांनी गळफास घेतला अशी माहिती पुढे आली. ही माहिती मिळताच सावंतवाडी येथे राहणारे तीचे भाऊ व पेडणेकर कुटुंबियांनी वेंगुर्ले येथे धाव घेतली, वस्तुस्थिती बघितल्यावर आम्हा कोणालाच तीने आत्महत्या केली यावर विश्वास बसला नाही. तीच्या डोक्याला भली मोठी जखम होती, फरशीवर पडलले रक्त गायब झाले होते, रक्त पुसलेले कपडेही गायब होते, व ज्या ठिकाणी तीने गळफास घेतला ती उंचीही खूप होती, मग तीचा हात दोरी अडकवयाला कसा पोहचला, व आत्महत्या केली तर डोक्याला जबरी घाव कसा या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीत आहेत. त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास होणे गरजेचे आहे.अशी मागणी माजी नगरसेवक पेडणेकर यांनी केली आहे.

चौकेकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांकडून वेंगुर्ले येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात येत होता. परंतु या रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी तज्ञ नसल्याने पेडणेकर कुटुंबीयांनी येथे शवविच्छेदन न करता कोल्हापूर येथे करावे असे सुचविले. त्यानुसार मृतदेह काल सायंकाळी कोल्हापूर येथे घेण्यात आला. तेथील प्राथमिक अहवालात मयत चौकेकर हिच्या डोक्याला खोल जखम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आमचा संशय बळावला आहे. पुणे येथील लॅब चा अहवाल आल्यानंतर खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे माजी नगरसेवक पेडणेकर यांनी सांगितले.

दरम्यान आज संध्याकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करून आपण उद्या वेंगुर्ले पोलीस ठाण्यात ही आत्महत्या नसून घातपात असल्याची रीतसर तक्रार करून सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे श्री. पेडणेकर यांनी सांगितले.