
वेंगुर्ले : तिलारी वरून येणाऱ्या पाणीपुरवठा पाइप लाइनसाठी उभादांडा मानसिश्र्वर येथे चालू असलेले खोदकाम येथील लोकप्रतिनिधी सहित ग्रामस्थांनी रोखले. रस्ता खोदकाम करण्याची परवानगी नसताना खोदकाम कसे केले? असा प्रश्न ग्रामस्थांनी संबंधित अभियंताना विचारला. रीतसर परवानगी नसेल तर काम करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा उपस्थित ग्रामस्थांनी घेतला. तसेच रस्ता खोदकाम करून त्यावर सिमेंटीकरण न करता रस्ता डांबरीकरण करून देण्याची मागणी देखील त्यांनी केली.
यावेळी साईट वर काम सुरू असताना कोणीही अधिकारी उपस्थित नसतात यामुळे कोणतीही समस्या निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असा सवालही केला. संबंधित कामाची वर्क ऑर्डरची मागणी ग्रामस्थांनी केली असता उपस्थितानी देण्यास नकार दिल्यामुळे रीतसर काम सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. पाईप लाइन साठी आमचा आक्षेप नाही पण रस्त्या पासून काही अंतरावर होत असलेल्या नवाबाग बीच वर बंधाऱ्याचे काम सुरू आहे तेथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये - जा सुरू आहे त्यामुळे सिमेंटीकरण रस्ता फार काळ टिकणार नाही त्यामुळे रस्ता डांबरीकरण करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून त्याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी जि. प. माजी सदस्य दादा कुबल, भाजपा जिल्हा युवामोर्चा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, युवा मोर्चा विधानसभा प्रमुख हितेश धुरी, उभादांडा शक्तीकेंद्र प्रमुख निलेश मांजरेकर, मच्छीमार नेते दादा केळुसकर, माजी सरपंच देवेंद्र डीचोलकर, तुषार साळगावकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.