
सावंतवाडी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा यशस्वी प्रतिकार करणाऱ्या पोलीस पथकाला केंद्र सरकारने ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’ देऊन सन्मानित केले आहे. या सन्मानित पथकात डीआयजी सेंट्रल कश्मीर राजीव पाण्डेय (I.P.S) यांचाही गौरव करण्यात आला आहे. ते मुळ सावंतवाडी येथील असून त्यांच्या या यशामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
राजीव पाण्डेय हे उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील पट्टी तहसीलच्या अशोकपूर गावाचे मूळ रहिवासी आहेत. मात्र, त्यांचे बालपण सावंतवाडी येथे गेले. सावंतवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नं. ४, कळसुलकर इंग्लिश स्कूल व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै.डॉ.ओमप्रकाश पाण्डेय यांचे ते चिरंजीव होत. त्यांचे शिक्षण सावंतवाडीत झाले असून त्यांचे निवासस्थान देखील येथे आहे. त्यांच्या या यशाची बातमी मिळताच संपूर्ण परिसरात अभिमान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुपुत्राच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने त्वरित "ऑपरेशन महादेव" राबवून या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या मिशनमध्ये असाधारण नेतृत्व आणि रणनीतिक क्षमता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आयजी कश्मीर व्ही.के. बिर्दी, एसएसपी श्रीनगर जी.व्ही. सुनीदीप, एसपी कार्गो तनवीर डार यांचा ही सन्मान करण्यात आला आहे.
२०२४ मध्ये पदके सादर करण्यात आली- केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदके १ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू करण्यात आली. देशभरातील पोलिस दल, सुरक्षा संस्था, गुप्तचर विभाग, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विशेष शाखा, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, केंद्रीय पोलिस संघटना आणि न्यायवैद्यक विज्ञान विभागातील कर्मचाऱ्यांना ते प्रदान केले जातात. उत्कृष्ट कामगिरीची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि पोलिस दल आणि अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हे पदक दिले जाते. दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी ही पदके जाहीर केली जातात.










