
दोडामार्ग : दोडामार्ग शहरालगत असलेल्या पांडवकालीन देवस्थान असलेल्या कसईनाथ डोंगराचा काही भाग खचल्याची बातमी सायंकाळी उशिरा सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि तालुक्यात एकच खळबळ उडाली. मात्र याबाबत संबधित वनधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी स्थानिक पातळीवर चौकशी केली असता तो डोंगर खचल्याची घटना ही अफवा असल्याचे स्पष्ट केलं आहे. मात्र दोडामार्ग शहरांत सायंकाळी उशिरा दाखल झालेल्या काहींनी आपण डोंगर खचल्याचा आवाज एकल्याचे सांगितल्याने व याबाबत एका हॉटेल मध्येही याची चर्चा झाल्याने या घटनेबाबत मोठी संभ्रमअवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळं पांडवकालीन कसईनाथ डोंगर कोसळला की ती अफवा हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे.
रविवारी सायंकाळी उशिरा डोंगर खचल्याच्या घटना सोशल मीडियावर पुढे आली. त्या घटनेला गिरोडे येथे ग्रामस्थांनी दुजोरा दिल्याचेही त्यात नमूद करण्यात आलय. इतकंच नव्हे तर डोंगर खचल्याच्या घटनेने त्या डोंगरातील मोर व माकड यांचं बराच काळ आरडा ओरड ही झाल्याचे म्हणण्यात आलं होतं. मात्र उशीर झाल्याने आणि ही घटना उशिरा घडल्याने काळोखात याबाबत खातरजमा करताना बऱ्याच अडचणी येत होत्या. दरम्यान आमच्या प्रतिनिधीनी येथील स्थानिक वन कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता अशी कोणती दुर्घटना घडल्या नसल्याचं त्यांचेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र याबाबत खरी वस्तुस्थिती सोमवारीच स्पष्ट होणार आहे.
दोडामार्ग शहरातून एखाद्या पिऱ्यामिड सारखा दिसत असलेला कसईनाथ डोंगर दोडामार्ग शहर व तालुक्याची ओळख म्हणून संबोधला जातो. याचं डोंगराला पांडवकालीन डोंगर म्हणूनही ओळखला जातो. डोंगर माथ्यावर महादेवाचे स्वयंभू स्थान असल्याने श्रावण महिन्यात हजारो भक्त या डोंगरच्या माथ्यावर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी डोंगरावर चढून जातात. या डोंगराच्या माथ्यावर गेल्यानंतर चारही बाजूंनी निसर्गाचे विहंगम दृश्य बघायला मिळते. इतकंच नव्हे तर गोवा राज्याचा काही भागही बघायला मिळतो. याच डोंगराचा काही भाग गिरोडे गावच्या दिशेने मोठा आवाज येत रविवारी सायंकाळी साडेसहा ढासळल्याची घटनेची चर्चा समोर आली आणि खळबळ उडाली. गिरोडा गावातील काही ग्रामस्थ शेतात काम करत असताना ही घटना घडल्याचीही बोलले जातेय. जंगल भाग व अंधार यामुळे आपण तिथे जाऊ शकलो नाही, असंही ज्यांनी बाजारपेठ मध्ये ही बातमी आणली त्यांनी म्हटल्याचे समजते आहे. मात्र याबाबत खरी हकीगत सोमवारीचं स्पष्ट होणार आहे.