डायलिसिसच्या पेशंटना 'निरामय' केंद्रातर्फे आर्थिक मदत !

Edited by: ब्युरो
Published on: January 31, 2024 12:04 PM
views 108  views

सावंतवाडी : निरामय भवन कोलगाव, इथे डायलिसिस च्या 8 पेशंट ना निरामय विकास केंद्रातर्फे आर्थिक मदत देण्यात आली.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला निरामय च्या संस्थापक अध्यक्ष डॉ.शालिनी सबनीस यांच्या प्रतिमेला बकुळ फुलांचा गजरा घालण्यात आला. त्यानंतर निरामय प्रार्थना म्हणण्यात आली. निरामय चे ट्रस्टी प्रसाद घाणेकर यांनी उपस्थित सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे स्वागत केले. वंदना करंबेळकर यांनी प्रास्ताविक केले. विनया बाड यांनी रुग्णांना आहारविषयक मार्गदर्शन केले. तसेच वैयक्तिक मार्गदर्शन मोफत करण्याचे आश्वासनही दिले.

त्यानंतर प्रसाद घाणेकर यांनी मंगेश पाडगावकर यांच्या दोन कवितांचे वाचन केले. त्यापैकी 'सांगा कसं जगायचं' ही कविता उपस्थित सर्वांनी त्यांच्या बरोबर म्हटली. त्यानंतर अर्चना वझे यांनी 'कृपा सरोवर' भजन गायन केले. मग सर्वांनी मिळून आज गांधीजी पुण्यतिथी निमित्त 'रघुपती राघव राजाराम' हे भजन म्हटले.

शेवटी रुग्णांना आर्थिक मदतीचे चेक देण्यात आले व फोटो काढून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमासाठी निरामय केंद्राचे ट्रस्टी, तसेच सहकारी व सावंतवाडी डायलिसिस केंद्राचे श्री तानाजी उपस्थित होते.