डायल 112 बाबत वेंगुर्ला पोलिसांचे पथनाट्याद्वारे मार्गदर्शन

Edited by: दिपेश परब
Published on: December 10, 2024 19:49 PM
views 153  views

वेंगुर्ला :  सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशान्वये व वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस व न्यू इंग्लिश स्कुल मातोंडच्या शालेय विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमानाने डायल 112 बाबत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. वेंगुर्ला एसटी स्टँड समोरील पटांगणावर आज मंगळवारी (१० डिसेंबर) डायल 112 जलद प्रतिसाद या कार्यप्रणाली बाबत हे पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाटयाद्वारे जन माणसात 112 बाबत माहिती देण्यात आली व त्याचा उद्देश काय आहे हे दाखविण्यात आले. महिला पोलीस हवालदार रंजीता चौहान व महिला पोलीस नाईक सावी पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील सर्व शिक्षक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. 

 महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान  व महिला पोलीस नाईक सावी पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक शाळा कॉलेज या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना नशा मुक्ती, सायबर फ्रॉड व डायल 112 बाबत जनजागृती पर कार्यक्रम घेतलेले होते. या अभियानाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये तसेच महिला व मुलींमध्ये डायल 112 बाबत जनजागृती होऊन एखाद्या अडचणीच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी आपल्याला पोलीस मदत तात्काळ मिळते हा आहे.

या कार्यक्रमाची शेवटी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी डायल 112  या कार्यप्रणालीचा संकट काळी वापर करून पोलीस मदत मागून घ्या जेणेकरून पुढे होणारा अन्याय किंवा अत्याचार थांबू शकतो असे जनतेला आवाहन केले. तसेच पोलिस हवालदार रंजिता चौहान व महिला पोलीस नाईक सावी पाटील यांनी जनतेला डायल 112 बाबत अधिक माहिती देऊन याची कार्यप्रणाली कशाप्रकारे चालते तसेच त्याचा योग्य वापर करणे बाबत मार्गदर्शन केले.

 यावेळी वेंगुर्ला एसटी डेपो मॅनेजर राहुल कुंभार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश तावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण,महिला पोलीस हवालदार संजिता चौहान, अनुराधा देसाई, पोलीस नाईक सावी पाटील, वाहतूक पोलीस मनोज परुळेकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश पालकर, महिला कॉन्स्टेबल तुळशी मांजरेकर, पोलिस हवालदार सखाराम परब , न्यू इंग्लिश स्कुल मातोंड मुख्याध्यापक संजय तुळसकर यांच्यासाहित तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. या पथनाट्यात मातोंड हायस्कुलच्या शिक्षक अर्चना पाटील, प्रतीक्षा परब, संजीवनी तुळसकर, विद्यार्थी दिक्षिता मातोंडकर, काजल परब, कोमल मेस्त्री, वैदिक मोहिते, पार्थ नासरे, रोहित नर्से, मंथन परब, कृष्णा महितो वेदांत राऊळ यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन परुळकर यांनी केले. 

महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान यांनी यापूर्वी देखील वेंगुर्ला हद्दीमध्ये अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम राबविलेले आहेत व त्यातून जनजागृतीचे उत्तम काम केलेले आहे. सन 2022 मध्ये सायबर फ्रॉड या विषयावर शिरोडा वेळागर येथे अशाच प्रकारे पथनाट्य सादरीकरण करुन त्यातून जनजागृती केली होती. वेंगुर्ले पोलीस ठाण्याकडून लोकांमध्ये जनजागृतीचे उल्लेखनीय काम प्रत्येक वेळी दिसून आलेने जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे.