धामापूर भगवती मंदिराकडे जाताय ?, सांभाळून !

मुख्य रस्त्यावर 6 - 8 फूटी मगरीचं दर्शन
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 18, 2023 19:59 PM
views 158  views

मालवण : मालवण धामापूर भगवती मंदिर परिसरात मगरींचा संचार सुरू आहे. सहा ते आठ फूट लांबीची मगर मुख्य रस्त्यावर दिसून आली. त्यामुळे धामापूर तलावात मगरींचे वास्तव्य आहे हे अधोरेखित झाले. दरम्यान, मगर आढळून आल्यानंतर वन विभागाने खबरदारीचे आवाहन केले आहे. 


मालवण - कुडाळ मार्गावर काल सोमवारी रात्री सवा बारा वाजण्याच्या दरम्यान धामापूर  भगवती मंदिर परिसरातील पुलानजिक मुख्य रस्त्यावर एक सुमारे सहा ते आठ फूट लांबीची मोठी मगर फिरत असलेली वाहन चालकांना दिसून आली. वाहनचालकांनी याबाबत स्थानिक रहिवाशी ॲड. कन्हैया निवतकर यांना दूरध्वनीवरुन ही माहिती दिली. त्यानंतर आज सकाळी ॲड. निवतकर, सरपंच सौ. मानसी परब,  उपसरपंच रमेश निवतकर यांनी वनविभागाचे वनपाल श्रीकृष्ण परीट यांना मगरीच्या संचाराबद्दल माहिती दिली. त्यानुसार आज दुपारी , वनरक्षक एस. एम. कांबळे, वनपाल राठोड यांनी धामापूर येथे येत मगर दिसलेल्या परीसराची पाहणी केली. यावेळी सरपंच सौ. मानसी परब , उपसरपंच रमेश निवतकर, प्रशांत गावडे, महेश परब हे उपस्थित होते . 

यावेळी स्थानिक रहिवाशांनी धामापूर तलाव परीसरात फिरताना खबरदारी घ्यावी, तसेच तलावाच्या पाण्यात उतरू असे आवाहन वनरक्षक एस. एम. कांबळे यांनी केले आहे.