'ढगाआढचा चंद्र' म्हणजे कृतिशील विचारांच्या आत्मशोधातून निर्माण झालेले साहित्य! - महावीर जोंधळे

सावंतवाडीत नव्या आवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 21, 2022 10:27 AM
views 216  views

सावंतवाडी : साहित्यात असो अथवा सांस्कृतिक जडणघडणीत माणूस कधीच जन्मजात प्रतिभावंत नसतो, तो घडणाऱ्या परिस्थितीतून विकसित होत असतो.

या देशातील हजारो वर्षातील विषमता ही आजही ढगातील अनेक चंद्र ह्याच प्रवृत्तीतून गिळंकृत करीत असते. मात्र असे ढगाआढ झालेले चंद्र कृतिशील विचारांच्या आत्मशोधातून पुढे येत असतात. तेच माणुसकीची खऱ्या अर्थाने राखण करत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व नामवंत लेखक महावीर जोंधळे यांनी रविवारी येथे केले.

 जनवादी साहित्य संस्कृती चळवळ व मनोविकास प्रकाशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मूळ सावंतवाडी तालुक्यातील सातार्डाचे तथा गोव्यातील आंबेडकरवादी कार्यकर्ते चंद्रकांत जाधव यांच्या 'ढगाआढचा चंद्र' या आत्मकथनाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी महावीर  जोंधळे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

व्यासपीठावर गोव्यातील पर्यावरणवादी ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गावस प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. तर आघाडीचे कादंबरीकार प्रवीण बांदेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मनोविकास प्रकाशन संस्थेचे संचालक अरविंद पाटकर, जनवादी साहित्य संस्कृतीचे अध्यक्ष संपत देसाई, लेखक चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर जनवादी साहित्य संस्कृतीचे सचिव अंकुश कदम यांनी स्वागत केले. अध्यक्ष संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रकाशक अरविंद पाटकर यांनी आपली मालवणी ओळख सांगून हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करण्याचा धाडसी निर्णय आपण का घेतला? याचे विवेचन करून सुरुवातीला हे पुस्तक वाचताना माझ्याही आयुष्यातील चळवळीचे दिवस आठवले हे सांगून गुराखी आणि राखणो यातील फरक स्पष्ट केला. गुराख्याचे जीवन समजून घेण्यासाठी व अशा भयावह परिस्थितीतूनही त्यांनी जीवनात कशी उभारी घेतली? हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक विकत घेऊनच वाचा व वाचन संस्कृतीला चालना द्या, असे आवाहन केले.

 लेखक प्रा. बांदेकर यांनी पुस्तकावर समीक्षा करताना 'गुराखी' हा शब्द जरी कामाचे स्वरूप स्पष्ट करत असला तरी खऱ्या अर्थाने 'राखणा' हा शब्द समर्पक असल्याचे स्पष्ट केले. लेखकाने आपल्या आईचे वर्णन नकारात्मक जरी केले असले तरी त्यामागील बोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लेखकाचे सामर्थ्य हे पदव्यात नसून लिखाणात असते हे सांगून श्री. जाधव यांचे लिखाण दर्जेदार, सकस असून गरजेनुसार मालवणीचा वापरही त्यांनी कल्पकतेने केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख वक्ते रमेश गावस यांनी चंद्रकांत जाधव यांनी आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर जे भोगले, त्या भोगाचा वचपा आपल्या कर्तृत्वाने काढला आणि सुईच्या धाग्यातून शिलाईच्या माध्यमातून खऱ्या चंद्राचा शोध घेतला हे स्पष्ट केले. लेखक चंद्रकांत जाधव यांनी आपण गुराखी ते लेखक कसा बनलो, याबाबत आपला जीवनप्रवास स्पष्ट केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे यांनी मनोगत स्पष्ट केले. यावेळी 'सूर्य गिळणारी स्त्री' च्या लेखिका अरूणा सबाणे( नागपूर), 'जग बदलणारे ग्रंथ' च्या लेखिका दीपा देशमुख, इंदुमती जोंधळे आदींसह प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. डॉ. देविदास बोर्डे, कवी विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर, कवयित्री सरिता पवार, ॲड. संदीप निंबाळकर, पत्रकार अवित बगळे, डॉ. महेश पेडणेकर, ॲड. योगेश पवार, प्रवीण कोटकर, दीपक पडेलकर, प्रवीण केरकर, जगन्नाथ पंडित, बी. एल. कदम, पत्रकार मोहन जाधव, अनंत कदम, प्रभाकर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी प्रकाशक अरविंद पाटकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद माटे यांनी केले. अंकुश कदम यांनी आभार मानले. या कार्यक्रमानंतर सत्यशोधक परिवाराचा शाहिरी जलासा कार्यक्रम पार पाडला.