सावंतवाडीत ब्लड बँकेतील टेक्निशियन सोमवारपर्यंत भरा !

....अन्यथा तीव्र आंदोलनाचा देव्या सुर्याजींचा इशारा
Edited by: विनायक गांवस
Published on: June 22, 2023 21:21 PM
views 154  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी ही केवळ दोन जणांच्या जीवावर सूरु आहे. पदभरती करणं आवश्यक असताना केवळ दोघांच्या जीवावर ही ब्लड बँक सुरू आहे. वारंवार निवेदने देऊन इशारे देऊन देखील पदभरती केली जात नाही आहे. वैद्यकीय प्रशासनाचा याकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत ८ टेक्निशियन आहेत. यातून सावंतवाडीची ब्लड बँक बंद करण्याचा घाट प्रशासन आखत असल्याचे यातुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या सोमवार पर्यंत सावंतवाडी रक्तपेढीत एक तरी टेक्निशियन न झाल्यास तालुक्यातील रक्तदात्यांसह उपजिल्हा रुग्णालयासमोर बसून काळी फीत बांधून वैद्यकीय प्रशासनाचा निषेध करत तीव्र आंदोल छेडलं जाईल असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.


ते म्हणाले, सध्यस्थितीत केवळ दोन जणांच्या जीवावर ब्लड बँक सुरू आहे. दिवसाला रक्ताची गरज या ब्लड बँकेतून भासत आहे. रक्तदाते सामाजिक भान ठेवत रक्तदान करत आहे. असं असतांना देखील प्रशासनाला वारंवार विनंती अर्ज करून कोणत्याही प्रकारची हालचाल केली जात नाही. जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत ८ टेक्निशियन आहेत. मात्र, सावंतवाडीत दोघेच काम करत आहेत. त्यातील एक रजेवर आहे. त्यामुळे एकावरच सर्व भार पडत आहे. रक्तदान शिबीरासाठी देखील त्यांना गावागावात जावं लागतं आहे. ४८ तास एक कर्मचारी काम करत आहे. त्यातील हा कर्मचारी ही महिला असल्यानं त्यांचीही गैरसोय होत आहे. त्यामुळे गरजेचा वेळी रक्तपेढीत कर्मचारी उपस्थित नसतो. याचा रूग्णांच्या नातेवाईकांना फटका बसत असून रूग्णांच्या जीवावर बेतत आहे. यास्तव येत्या सोमवार पर्यंत ब्लड बँकमधील रिक्त पदे न भरल्यास रुग्णालयासमोर बसून काळी फीत बांधून वैद्यकीय प्रशासनाचा निषेध करत तीव्र आंदोल छेडलं जाईल संभाव्य परिस्थितीला जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य प्रशासन जबाबदार राहतील असा इशारा देव्या सुर्याजी यांनी दिला आहे.