कोकणातील हिंदू - मुस्लिम एकतेचे प्रतीक

सद्गुरू मियांसाब यांच्या समाधीस्थळी भक्तगण नतमस्तक
Edited by: विनायक गांवस
Published on: June 21, 2025 16:18 PM
views 199  views

सावंतवाडी : संतांची भूमी असणाऱ्या कोकणातील सद्गुरू मियांसाब हे सर्व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन धर्मातील अध्यात्माच्या प्रगतिपथावर पाऊल टाकणारे सद्गुरू आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते. सर्वधर्मांचा अंतिम हेतू 'परमेश्वर' ही शिकवण देणाऱ्या सद्‌गुरू मियांसाब यांचा ८० वा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. हिंदू - मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या परमपूज्य श्री सद्गुरू मियांसाब यांचा कोलगाव येथील या समाधीस्थळी सावंतवाडीसह जिल्हाभरातील भक्तगणांनी नतमस्तक होत चादर अर्पण केली.



पूर्वीचे सावंतवाडी संस्थान अर्थात बांदा येथील रहिवासी मुसलमानी धर्म पंथांतील 'सद्गुरु' घराणे होते. या घराण्यात हे महासंत उदयास आले. मुसलमान धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांचे नाव त्यांना ठेवण्यात आले. बांधकाम विभागात अधिकारी असणाऱ्या मियांसाब यांचे शिर्डीच्या साईबाबांच्या समाधी बांधकामात मोठे योगदान होते. 'महंमद अबदुल्ला सद्गुरु' अर्थात सद्गुरू मियांसाब यांचा योगी एकादशी दिवशी पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. सीताराम महाराज यांचे ते शिष्य असून सावंतवाडी व कोलगाव येथील स्थानिकांचा व व्यापारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठा वाटा असतो. मियाँसाब यांच्या समाधीवर चादर चढवून नवस फेडले जातात. यावर्षी ८० व्या पुण्यतिथीला जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळपासूनच सद्गुरू पूजन, नामस्मरण, कीर्तन, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत वाचन हरिपाठ, आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाप्रसाद पार पडला. जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक येथील भाविकदेखील पुण्यतिथीनिमित्त समाधीवर चादर अर्पण करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी वसंत राणे, सतीश शिरोडकर, दत्तप्रसाद अरविंदेकर, शैलैश पई, उमेश कोरगावकर, श्री. सावंत, श्री. मसुरकर यांसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.