
देवगड : देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील दक्षिण 'कोकणची काशी' म्हणून संबोधले गेलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर आणि परिसरातील मंदिराच्या रंगरंगोटीच्या कामांचा शुभारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांच्या उपस्थितीत कुणकेश्वर व श्री देव भैरव यांना श्रीफळ वाढवून या कार्याचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.
रंगकामाच्या शुभारंभावेळी बोलताना अध्यक्ष एकनाथ तेली म्हणाले की, "मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.हे काम पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विशेषसहकार्यातून पूर्ण होत आहे."ते पुढे म्हणाले, "माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी कुणकेश्वरच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही.जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, तेव्हा त्यांनी मोकळ्या हाताने मदत केली आहे."रेवदंडा-रेड्डी (रेडी-रेवस) सागरी महामार्गावर कुणकेश्वर मंदिराजवळ होणाऱ्या १८२ कोटींच्या पुलाबाबत माहिती देताना तेली यांनी स्पष्ट केले की, या पुलामुळे भाविकांच्या श्रद्धेला कोणतीही बाधा पोहोचणार नाही.ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टला विश्वासात घेऊनच या पुलाचे काम मार्गी लावले जाणार आहे.महाशिवरात्री यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन सज्ज झाले असून ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने यात्रेचे नियोजन सुरू झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांचा ओघ वाढण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने सोयीसुविधांचे काम सुरू आहे.
विविध देवस्वाऱ्यांनी यात्रेच्या नियोजनासाठी लवकरात लवकर देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर,देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश वाळके, खजिनदार उदय पेडणेकर, व्यवस्थापक रामदास तेजम आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.










