सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचा वर्धापनदिन उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: December 23, 2025 21:18 PM
views 15  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली येथे शाळेचा २१ वा वर्धापन दिन २२ व २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दोन दिवसीय कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, साहसी प्रात्यक्षिके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी मुख्य पाहुणे सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात झाली. यावेळी सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विनोद कांबळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

शाळेचे प्राचार्य श्री. नितीन गावडे यांनी प्रास्ताविकात वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला. उपअधीक्षक विजय पांचाळ यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेकडून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी गणेश वंदना आणि विविध हिंदी-मराठी गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. वर्षभरात शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये 'बेस्ट टीचर' म्हणून श्री. अरुण गावडे, श्री. मायाप्पा शिंदे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांने कोलाजच्या माध्यमातून त्यांना शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर संचलन मैदानावर विद्यार्थ्यांनी दिलेली मानवंदना आणि सादर केलेले उत्कृष्ट संचलन उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

लहान सैनिकांनी लाठीकाठी, झांज प्रात्यक्षिक, ज्युडो कराटे, मल्लखांब, लेझिम आणि व्हॅली क्रॉसिंग यांसारखी साहसी प्रात्यक्षिके सादर करून पालकांची मने जिंकली. या दिवशी शाळेच्या 'वेध' या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षेत आणि शालेय निकालात चमकलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

१० वी बोर्ड परीक्षा: कॅडेट अशोक विलास घोडके (प्रथम).

१२ वी बोर्ड परीक्षा: कॅडेट तनुष गुरुनाथ राऊत (प्रथम).

विशेष पुरस्कार: कॅडेट गिरीराज मुंडल्या (बेस्ट कॅडेट) आणि कॅडेट हर्ष देसाई (बेस्ट स्पोर्ट्समन).

हाऊस रँकिंग: 'प्रतापगड हाऊस'ची चॅम्पियन हाऊस ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली. डिजिटल शाळेचा संकल्प

संस्था अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी आपल्या भाषणात शाळेच्या यशाचे श्रेय शिक्षकांना दिले. शाळेचा १०वी आणि १२वीचा निकाल १०० टक्के लागत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, येत्या काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी संपूर्ण शाळा 'डिजिटल' करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आणि यासाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री 'माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यात या शाळेने प्रथम क्रमांक पटकावल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला सरपंच सौ. सावित्री पालयेकर, संचालक जॉय डॉन्टस, शिवाजी परब, माजी सैनिक सुभेदार मेजर बाळकृष्ण गावडे, दीपक राऊळ आणि मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हृषिकेश गावडे व श्री. हंबीरराव अडकूरकर यांनी केले, तर आभार प्राचार्य नितीन गावडे यांनी मानले.