
ओरोस :ओरोस रिक्षा युनियनमध्ये कोणतेही मतभेद नसून संघटना पूर्णपणे एकजूट आहे. परशुराम परब हे केवळ स्वतःची प्रसिद्धी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, असा आरोप युनियनचे अध्यक्ष नागेश ओरोसकर यांनी केला. परशुराम परब यांनी "अध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे युनियनमध्ये दोन गट पडणार आहेत" असे वक्तव्य केले होते. या विधानामुळे ओरोस येथील जिल्हा 'नाना-नानी पार्क' येथे युनियनची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत परब यांच्या आरोपांचे जोरदार खंडन करण्यात आले. अध्यक्ष नागेश ओरोसकर यांनी परशुराम परब यांच्या मागील कार्यकाळातील कारभारावर टीका केली. त्यांनी खालील मुद्दे मांडले :
रजिस्ट्रेशन आणि ऑडिटचा अभाव: १९९६ मध्ये युनियनची स्थापना झाली, मात्र १३ वर्षे रजिस्ट्रेशन प्रलंबित होते. परब खजिनदार, सुरेश ओरस्कर हे अध्यक्ष असतानाही त्यांनी १२ वर्षे ऑडिट किंवा रजिस्ट्रेशनकडे केले नाही. २०२१ मध्ये अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ओरोसकर यांनी सर्व प्रलंबित ऑडिट पूर्ण करून संघटनेचे कामकाज नियमानुसार सुरू केले. "खरी मनमानी परब यांनीच २००९ ते २०२१ या काळात केली आहे. संघटनेच्या आर्थिक व्यवहारात त्यांचा कसा वाटा होता आणि पैसे कसे वापरले गेले, याचे सर्व लिखित पुरावे व रेकॉर्ड युनियनकडे उपलब्ध आहेत," असे ओरोसकर यांनी आरोप केले.
परशुराम परब यांनी जेव्हा युनियन फुटण्याचे विधान केले, तेव्हा त्यांच्यासोबत केवळ तीनच रिक्षावाले होते. स्वतःची मनमानी चालत नाही म्हणून ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. "त्यांना नवी संघटना स्थापन करायची असल्यास आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, पण त्यांच्या अशा आरोपांना आम्ही भीक घालत नाही," अशा शब्दांत ओरोसकर यांनी परब यांना सुनावले. या बैठकीत अध्यक्ष नागेश ओरोसकर आणि उपाध्यक्ष अजित परकर यांनी परब यांच्या विधानाचा निषेध केला. यावेळी दिलीप मुळीये, अजित परकर, भिसाजी परब, दिगंबर गोसावी, रामदास अंगणे, प्रकाश अंगणे, अनिल ओरोसकर, रवींद्र भगवान कदम यांच्यासह युनियनचे अन्य रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










